रात्रभर चालणार पिंजऱ्याचा खेळ; १० जणांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची नवी आयडिया

आनंद चलाख /श्रीकृष्ण गोरे
Saturday, 17 October 2020

वनरक्षकांचा जिवितास धोका नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत असले तरी वनविभागाचा या थरारक खेळीने वनमजूर, वनपालांचे कुटूंब हादरले आहे. वाघाला पकडण्यासाठी रात्री वनपाल व वनमजुरांचे जागरण सुरू आहे.

राजूरा ( चंद्रपूर ) : दहा लोकांचा बळी घेणाऱ्या आर टी वन वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सूरू आहेत. सतत हूलकावणी देणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता सापळा रचला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. यासाठी चक्क  पिंजऱ्यामध्ये वनपाल, वनमजूरांना बसविण्यात आले आहे. दुसऱ्या पिंजऱ्याची दोरी वनमजूरांचा हातात असणार आहे. वाघ पिंजऱ्याचा आत शिरताच ही दोरी ओढली जाणार आहे. दोरी ओढताच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होणार असून वाघ पिंजऱ्यात अडकणार आहे. यात वनपाल, वनरक्षकांचा जिवितास धोका नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत असले तरी वनविभागाचा या थरारक खेळीने वनमजूर, वनपालांचे कुटूंब हादरले आहे. वाघाला पकडण्यासाठी रात्री वनपाल व वनमजुरांचे जागरण सुरू आहे.

राजूरा तालुक्यात धूमाकूळ घालणाऱ्या आर टी वन वाघाने आतापर्यंत दहा जणांचे बळी घेतले आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी 160 सिसिटीव्ही कॕमेरे जंगलात लावण्यात आले आहेत.200 वनकर्मचार्यांचा ताफा जंगलात गस्त घालीत आहेत.तर वाघाला बेशुध्द करण्यासाठी दोन शुटर, डॉक्टर तैनात आहेत. दिवसरात्र वनकर्माचारी वाघावर लक्ष ठेऊन आहेत मात्र प्रत्येक वेळी वाघ हूलकावणी देत  आहे.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

वनविभागाने वाघाला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात जनावरे ठेवली मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.दुसरीकडे वाघाला ठार करा,अशी मागणी शेतमजूर शेतकरी व लोकप्रतिनीधींनी लावून धरली आहे.वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा या मागणीसाठी शेतकरी ,शेतमजूरांनी रास्तारोखो आंदोलन केले.त्यामुळे वनविभागावर दबाव वाढला आहे. यातूनच वनविभागाने आता " जिवघेणी " खेळी खेळली आहे. वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.

वाघाला पकडण्यासाठी मुख्य पिंजरा असणार आहे. या पिंजर्यापासून 30 ते 40 मिटर अंतरावर उंच ठिकाणी दूसरा पिंजरा ठेवला गेला आहे.या पिंजऱ्यात आळीपाळीने सोळा वनपाल,वनरक्षक आणि वनमजूर बसणार आहेत. मुख्य पिंजर्याचा दरवाजाला बांधलेली दोरी पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचार्यांचा हातात असणार आहे.

मुख्य पिंजऱ्यात वाघ येताच ही दोरी ओढली जाईल.दोरी ओढताच मुख्य पिंजऱ्याचा दरवाजा बंद होईल अन वाघ पिंजऱ्यात अडकेल. या योजनेत पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचार्यांचा जिवाला कुठलाच धोका होणार नसल्याचे वनविभागाचा वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.मात्र अकाली पावसामुळे वातावरण खराब आहे. वनपाल, वन मजुरांना रात्रभर पिंजऱ्यात बसविणे कितपत योग्य आहे,यावर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली? आहे.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

राजुरा वनपरिक्षेत्रात वाघाची हालचाल ज्या भागात होत असते त्या ठिकाणी मोठा पिंजरा ठेवण्यात आलेला आहे. त्या पिंजऱ्याचा दरवाजा बंद करण्यासाठी 30 ते 40 मीटर अंतरावर सुरक्षित उंच ठीकाणी दुसरा पिंजरा लावण्यात आलेला आहे. वाघ पिंजऱ्यात येताच लांब रसी द्वारे तो गेट बंद करण्याची व्यवस्था उंच ठिकाणी असलेले व्यक्ती करतात. यात व्यक्तींची पूर्णपणे सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. दुसरा पर्याय म्हणून जाळी सुद्धा बांधण्यात आलेली आहे. लवकरच वाघ जेरबंद होईल अशी आशा आहे .त्या दृष्टीने वन विभागाची टीम कार्यरत आहे.
अरविंद मुंढे ,
उपवनसंरक्षक ,चंद्रपूर

संपादक - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest department organized cages to catch dangerous tiger