त्यांच्या कर्तव्याला सलाम; या अधिकाऱ्याने विझवला जंगलातील वणवा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

पोटेगाव वनपरिक्षेत्राच्या कक्ष क्रमांक 93 मध्ये आग लागल्याचे दिसून आले. विभागीय वनाधिकारी बिलोलीकर यांनी अग्निरक्षकांची वाट न पाहता स्वतः गाडी थांबवून व झाडाच्या डहाळ्यांच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. त्यांना इतरांनी व पोटेगावचे वनपरिक्षेत्राधिकारी धीरज ढेमरे यांनी मदत केली. ही आग आटोक्‍यात आल्याने पुढील धोका टळला.

गडचिरोली : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूंचा धुमाकूळ असला; तरी हाच काळ जंगलात वणवे पेटण्याचा आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी निसर्गावर येणाऱ्या संकटाशी पूर्ण शक्तीनिशी मुकाबला करीत आहेत. क्षेत्रीय दौऱ्यावर असलेले विभागीय वनाधिकारी (दक्षता) बिलोलीकर व त्यांच्या चमूने जंगलात वणवा दिसताच आपल्या कर्मचाऱ्यांची वाट न बघता स्वत: ही आग विझवली. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

वनविभागाने घ्यावी विशेष काळजी

सध्या गडचिरोलीमध्ये आगीचा हंगाम चालू आहे. जंगलात वणवे लागत आहेत. परंतु जंगलात वणवे लागू नयेत म्हणून गडचिरोली वनविभाग विशेष काळजी घेत आहे. त्यासाठी गावाच्या शेजारील, रस्त्यांच्या बाजूस व जंगलात असणाऱ्या मोहवृक्षांच्या खालील पालापाचोळा ब्लोअर मशिनद्वारे वनविभागामार्फत स्वच्छ करून दिला जात आहे.

जंगलात वणवे पेटले

विविध कार्यक्रम व जनजागृती करून लोकांना आग न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे; तरीही गडचिरोलीमध्ये सध्या जंगलात वणवे पेटले आहेत. त्यानंतर फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून सॅटेलाइटद्वारे आगीची माहिती दिली जाते. जंगलात गस्त घालताना अग्निरक्षक व वनरक्षक ब्लोअर मशिनद्वारे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले जाते.

वनविभागाला मदत करण्याचे आवाहन

अशाच कामांचे व वणवा नियंत्रणाचे काम पाहण्यासाठी गडचिरोली वनवृत्ताचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) बिलोलीकर, विभागीय वनाधिकारी कावरे व गडचिरोली वनविभागाचे सहायक वनसंरक्षक भडके आले असताना पोटेगाव वनपरिक्षेत्राच्या कक्ष क्रमांक 93 मध्ये आग लागल्याचे दिसून आले. विभागीय वनाधिकारी बिलोलीकर यांनी अग्निरक्षकांची वाट न पाहता स्वतः गाडी थांबवून व झाडाच्या डहाळ्यांच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : अहो ! स्वतःसाठी तरी सोशल डिस्टन्सिंगचा विचार करा...!

कोरकुटी येथील ग्रामस्थांच्या भेटी

त्यांना इतरांनी व पोटेगावचे वनपरिक्षेत्राधिकारी धीरज ढेमरे यांनी मदत केली. ही आग आटोक्‍यात आल्याने पुढील धोका टळला. त्यानंतर त्यांनी जमगाव, जडेगाव व कोरकुटी येथील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांना आगी न लावण्याचे तसेच आगी विझविण्यासाठी वनविभागाला मदत करण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the forest officer extinguishing the fire at gadchiroli