मुख्यालय सोडून वनकर्मचाऱ्यांचा शहरांत मुक्काम; अप-डाउनमुळे वन्यप्राण्यांची सुरक्षा वाऱ्यावर

डिलेश्‍वर पंधराम 
Wednesday, 6 January 2021

गोरेगाव येथे मुख्य कार्यालय असून, त्याचे 4 सहवनविभाग क्षेत्राधिकारी कार्यालय व 19 वनरक्षक बीट कार्यरत आहेत. या कार्यालयातून वनरक्षक, क्षेत्राधिकारी यांच्यामार्फत वनांची सुरक्षा, संवर्धन, वन्यप्राणी यांच्यावर निगा, संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली

गोरेगाव (जि. गोंदिया) ः वन व वन्यप्राण्यांची सुरक्षा, संरक्षणाची जबाबदारी वनाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, बहुतांश कर्मचारी मुख्यालय सोडून 15 ते 40 किलोमीटर अंतरावरून ये-जा करीत असल्याने वन्यप्राण्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. परिणामी, शिकारीच्या घटनांत वाढ होत आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी होत आहे.

गोरेगाव येथे मुख्य कार्यालय असून, त्याचे 4 सहवनविभाग क्षेत्राधिकारी कार्यालय व 19 वनरक्षक बीट कार्यरत आहेत. या कार्यालयातून वनरक्षक, क्षेत्राधिकारी यांच्यामार्फत वनांची सुरक्षा, संवर्धन, वन्यप्राणी यांच्यावर निगा, संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वन परिक्षेत्राधिकारी प्रवीण साठवणे, गोरेगाव क्षेत्राधिकारी हे मुख्यालयात राहतात. परंतु, या कार्यालयातील अनेक कर्मचारी मुख्यालयात न राहता गोंदिया,तिरोडा, आमगाव या शहरातून ये-जा करीत आहेत. त्यामुळे ते कर्मचारी वेळेवर वनांची सुरक्षा करण्यास असमर्थ आहेत. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

कर्मचारी मुख्यालयात राहात नसल्याची संधी शिकारी साधत असून ससे, रानडुक्कर, हरिण, सांभर, बिबट, सरपटणारे प्राणी यांची शिकार ते करीत करीत आहेत. त्यांचा मांस शहरापर्यंत किंवा एखाद्या समारोहात विक्री करीत आहेत. परंतु, कार्यरत वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना थांगपत्ता लागत नाही. सरकारने कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याची सक्ती केली आहे. तरीसुद्धा कर्मचारी या आदेशाची अंमलबजावणी न करता शहरात सुविधेप्रमाणे वास्तव करीत आहेत.

संरक्षक अप-डाउन करीत असल्याने गोरेगाव वनविभाग, वनपरिक्षेत्रात येणाऱ्या वन व त्या वनात राहणाऱ्या वन्यप्राण्यांची सुरक्षा केली जात नाही. याचे उदाहरण तिल्ली मोहगाव बिबट्याच्या मृत्यूवरून देता येईल. तालुक्‍यातील जंगलव्याप्त गावांमध्ये वन्यजीवाची शिकार करणे नेहमीचे झाले असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती होत नाही. एखादा बिबट्या किंवा वन्यप्राण्याचा मृत्यू झाला असेल तेव्हा पंचनामा करून किरकोळ कारवाई दाखविण्यात येते. त्यामुळेच शिकार करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. वनाधिकारी वन, वन्यजीवाची सुरक्षा, संरक्षण करण्यासाठी अप-डाउन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील काय? हा प्रश्‍न नागरिकांत आहे. 

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

गोरेगाव वनविभागाचे कर्मचारी मुख्यालयात राहात होते. कोणते कर्मचारी मुख्यालयात राहात नाही. याची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
एस. एस. सदगीर, 
सहायक वनसंरक्षक, वनविभाग, गोंदिया

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Officers are staying at city instead of Forest Office in Gondia