आयपीएल क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या फार्महाऊसवर  धाड, चौघांना अटक  

संजय आगरकर
Monday, 26 October 2020

24 नोव्हेंबरला इंडियन प्रिमीअर लीगअंतर्गत अबुधाबी येथे सुरू असलेल्या कोलकाता नाईट रायडर व दिल्ली डेक्कनच्या आईपीएल टी 20 क्रिकेट सामन्यावर कोंढाळी परिसरातील मसाळा शिवारात गुलमोहर फार्महाऊसच्या काॅटेजमध्ये सट्टा सुरू आहे. 

कोंढाळी (जि. नागपूर)  ः येथून आठ कि.मी. अंतरावरील राष्ट्रीय महामार्गालगतच्या मसाळा शिवारातील गुलमोहर फार्म हाऊसमधील काॅटेजमध्ये कोलकाता नाईट रायडर विरुद्ध दिल्ली डेक्कन आयपीएल टी 20 क्रिकेट मँचवर सट्टा लिहिताना चार आरोपींना नागपूर ग्रामीण गुन्हे शाखा पोलिस व कोंढाळी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की,  24 नोव्हेंबरला इंडियन प्रिमीअर लीगअंतर्गत अबुधाबी येथे सुरू असलेल्या कोलकाता नाईट रायडर व दिल्ली डेक्कनच्या आईपीएल टी 20 क्रिकेट सामन्यावर कोंढाळी परिसरातील मसाळा शिवारात गुलमोहर फार्महाऊसच्या काॅटेजमध्ये सट्टा सुरू आहे. 

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
 

नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व कोंढाळी पोलिसांनी धाड टाकून गुलमोहर फार्महाऊसच्या काॅटेजमध्ये मोबाईलवरून लोकांकडून पैशाची बाजी लावून जुगार खेळताना आरोपी दिनेश ताराचंद बन्सोड (वय 52 धम्मकिर्तीनगर वाडी  नागपूर ), अमोल शंकररार नाडीनवार (वय 40 गजानन नगर वाठोडा नागपूर), प्रवीण वाकडे, 33 देशमुख ले आऊट कोंढाळी , अतुल गंगाधर दोडके 45 माळा काँलनी नरेद्र नगर नागपूर हे चार आरोपी दिसले.
 
पोलिसांनी १ मारोती इंडिगो कार, ८ मोबाईल संच, १ कँल्क्युलेटर, 32 इंच एलसीडी टीव्ही, 1 टाटा स्काँय बाँक्स,  1 टाटा स्काँय छञी, जुगार लिहिलेले पाच कागद व पेन व इतर साहित्यासह 13 लाख 38 हजार 598 रुपयांचा माल जप्त केला. गुलमोहर फार्महाउस  आरोपी ताराचंद बन्सोड यांच्या मालकीचे असल्याचे समजते. त्याने नुकतेच हे फार्महाऊस विकत घेतल्याचे सांगण्यात येते. हा आरोपी आयपीएल सुरू झाल्यापासून येथे मोबाईलवरून सट्टा चालवीत असल्याचेही समजते.

आरोपींना कोंढाळी पोलिस स्टेशनला हजर करून पो. उपनिरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.  14 आॅक्टोंबरला सुद्धा नागपुर ग्रामीण गुन्हे अन्वेशन विभागाकडून कोंढाळी परिसरातील इगल रिसोडवर जुगार खेळताना 36 जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 42 लाख 73 हजार 320 रुपयांचा माल जप्त केला होता. 
 

कोंढाळी बनले अवैध धंद्याचे ठिकाण

कोंढाळी व परिसरात अवैध दारू विक्री व वाहतूक, जुगार, मटका , गांजा विक्री, रेतीची अवैध वाहतूक तसेच या परिसरातील रिसोड आणि फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. याकडे कोंढाळी पोलिसांकडून डोळेझाक सुरू असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढले असल्याचे सांगितले जाते.  

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested for raiding IPL cricket betting farmhouse