समाजमन सुन्न! गणपती-पुळेला जाण्यासाठी निघाले तरुण, पण वाटतेच काळाचा घाला; एकाच गावातील चौघे ठार

मनोज रायपुरे
Tuesday, 5 January 2021

सर्वजण रात्री हिवरा-हिवरी येथून गणपती-पुळेला देवदर्शनासाठी चालले होते. मात्र, हिंगणाघाटजवळ पोहोचताच चौघांवर काळाने घाला घातला.

हिंगणघाट (जि. वर्धा) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भरधाव चारचाकीने उभ्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान सेवाग्राममध्ये मृत्यू झाला. तसेच पाच जण जखमी आहेत. 

वाहन चालक शैलेश पंढरी गिरसावळे (वय २६), आदर्श हरीभाऊ कोल्हे (वय १७), सूरज जनार्दन पाल (वय २१) व मोहन राजेंद्र मोंढे (वय २२), असे मृतकाचे नावे असून हे सर्वजण उमरेड तालुक्यातील  हिवरा-हिवरी  येथील रहिवासी आहेत. तर, यश कोल्हे (१२ ), भूषण राजेंद्र खोंडे (२४), शुभम प्रमोद पाल (२३), प्रणय दिवाकर कोल्हे (१५), समीर अरुण मोंढे (१६),  असे जखमींचे  नावे आहे. हे सर्वजण रात्री हिवरा-हिवरी येथून गणपती-पुळेला देवदर्शनासाठी चालले होते. हिंगणघाटमधील राष्ट्रीय महामार्गावर रील रेल्वे पुलावरून रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास चारचाकी भरधाव वेगाने खाली उतरत असताना बंद ट्रकला मागून धडक दिली.

हेही वाचा - एटीएम क्‍लोनिंगचा म्होरक्‍या गजाआड; तपास पथकाने एकाला मुंबई येथून घेतले ताब्यात

नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता वळविला आहे. त्यामुळे हा अपघात झाला. अपघात होताच हिंगणघाट शहरातील सौरभ नाईक, सौरभ उरकुडे, शुभम नाईक, सागर तीमांडे, विक्की वाघमारे यांनी जखमी सर्वांना गाडीतून काढून उपजिल्हा रुग्णालयात हलविले. यापैकी तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत चव्हाण घटनास्थळी पोहोचले. तसेच रुग्णालयात पोहोचत मृतकांच्या व जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क करून त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले. मृतकाचे कुटुंब येताच मृतकांची ओळख पटली. रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच बघणाऱ्यांची घटनास्थळी तसेच उपजिल्हा रुग्णालयात भेट झाली होती.

हेही वाचा - Struggle : तिच्या गरीब संसारात ‘पदव्यां’ची श्रीमंती;...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीने गेले चार जीव -
राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील उड्डाणपूल उतरताच नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे उड्डाणपूल उतरताच रस्ता वळविला आहे. मात्र, याच वळणावर हिंगणघाट येथील अनेक ट्रक चालक आपले ट्रक उभे ठेवतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाते. या अपघातात ट्रक उड्डाणपूल संपताच उभा नसता, तर चार लोकांची जीवितहानी टळली असती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीमुळे चार लोकांना आपल्या जीवापासून मुकावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four died in car and truck accident in hinganghat of wardha