पवित्र रमझान रोजा सोडण्याची होती धावपळ अन् निदर्शनास ही आली धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

गावात पवित्र रमझान रोजा सोडण्याची धावपळ सुरू असताना अचानक आग लागली.

धामणगाव बढे (जि.बुलडाणा) : स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ब्राम्हंदा येथे 9 मे च्या संध्याकाळी 7 वाजेदरम्यान पवित्र रमझान महिन्यातील रोजा फळावर सोडून जेवणापूर्वीच अचानक इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट झाल्याने घरातून आगीचे लोट बाहेर येऊ लागले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ निर्माण होऊन सर्वत्र धावपळ सुरू झाली. सदर आगीत 5 ते 6 लाखाचे नुकसान झाले आहे.

गावात पवित्र रमझान रोजा सोडण्याची धावपळ सुरू असताना अचानक आग लागली. या आगीत एकूण 4 घर भस्मसात झाले असून, शे. रशीद शे. मेहबूब याचे घरातील सर्व साहित्य, रेशन, कपडे जळून खाक झाले असून अंगावरील कपडेच शिल्लक राहिले आहे. यामध्ये त्याचे जवळपास 2 लाखाच्याजवळ पास नुकसान झाले आहे. शे.शाहरुख शे.रशीद याचेही नुकसान दीड ते दोन लाखाचे जवळपास झाले असून शे.आयुब शे.ईसा सह शे. इरफान शे. अयुब याचेही बर्‍याच प्रमाणात नुकसान झाले आहे. 

आवश्यक वाचा - चिंताजनक! या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

एकूण 5 ते 6 लाखापर्यंत नुकसान झाल्याने या शेतमजुरांची ताळेबंदीच्या हलाखीत पवित्र रमझान ईदच्या जमवा जमवीची रोख रकमेसह काही महत्त्वाचे कागद पत्रही जळाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले. या आगीची माहिती वार्‍यासारखी पसरताच गणेशसिंग राजपूत, सभापती कैलास गवई, धामणगाव बढेचे दुय्यम ठाणेदार योगेश जाधव, ग्रा.सेवक राजेंद्र वैराळकर, पो.पा.संदीप काकर, सरपंच पती डिगांबर सोनोने, जगन्नाथ दराखे, कलीम कुरेशी सह गावातील व परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

याप्रसंगी विद्युत पुरवठा खंडित करून ग्रा.पं.च्या पाणी पुरवठ्याने आग आटोक्यात आणली. या आगीदरम्यान विझवणार्‍या नागरिकांनी महत्त्वपूर्ण दखल घेत गॅस सिलिंडर प्रथम बाहेर फेकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी आर. एस. उमाळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तर मोताळा तहसिलचे तहसीलदार व्ही. एस. कुमरे यांनी घटनास्थळाला भेट देवून आग ग्रस्थांना मदत कार्यासह शासन तुमच्या सोबत असल्याचा धीर दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four houses on fire at Bramhanda in buldana district