
अविनाश सेवकदास गोंडाणे (रा. प्रमोद कॉलनी, राजापेठ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
अमरावती : शेअरमार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून अधिक लाभ मिळवून देण्याचे आमीष दाखवून एका सेवानिवृत्त व्यक्तीची ४ लाख ४८ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.
अविनाश सेवकदास गोंडाणे (रा. प्रमोद कॉलनी, राजापेठ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. गोंडाणे यांना २० सप्टेंबर २०२० रोजी पहिल्यांदा एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्यांना गुंतवणुकीचे विविध प्लॅन समजावून सांगितले. एका ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होतो, अशी बतावणी केली. डब्ल्यूटीसी हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करायला लावले. गोंडाणे यांचे बँक डिटेल्स व दस्तऐवज घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या नावे, कधी विदेशात गुंतवणूक केल्याचे सांगून तेव्हापासून वेळकाढूपणा त्या अनोळखी व्यक्तींनी केला.
हेही वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे
या कालावधीत गोंडाणे यांच्याकडून तोतयांनी पाच ते सहा टप्प्यांमध्ये रक्कम मागवून घेतली. दिलेल्या दस्तऐवजाच्या आधारे गुंतविलेल्या पैशाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार सुद्धा तोतयांनी स्वत:कडे राखून ठेवले. मध्यंतरी गोंडाणे यांना डब्ल्यूटीसी या अप्लीकेशनमध्ये त्यांचे खाते उघडल्याचे दाखविले. परंतु, दिलेल्या मुदतीत संबंधितांकडून काही रिप्लाय मिळत नव्हता. तोतयांशी संपर्क साधला असता, त्यांनी काही दिवसानंतर टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे अधिक लाभाचे आमीष दाखवून प्राप्त केलेले पैसे ट्रेडिंगमध्येच की, दुसरीकडे याबाबतही संभ्रम आहे. अखेर गोंडाणे यांनी सायबर पोलिसात धाव घेतल्यानंतर त्यांच्यासोबत संपर्क साधणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.