"आठ महिने काम अन्‌ चार महिने थांब' ; खापरखेडा पाचशे मेगावॉट वीज केंद्रातील प्रकार; कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ 

दिलीप गजभिये
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

फक्त आठ महिने काम देऊन चार महिने त्यांना घरी बसविले जात असल्याने यातीलच काही कंत्राटी कामगारांना चार महिने कामासाठी इतरत्र भटकावे लागते.

खापरखेडा, (जि. नागपूर)  : संपूर्ण देशात नाव असलेल्या खापरखेडा येथे स्वातंत्र्यानंतर तिसऱ्यांना नव्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाने युक्त असे वीज केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र येथे कामगारांची चांगलीच गोची होत असल्याचे चित्र आता समोर येत आहे. वर्षांत बारा महिने असताना आठ महिन्यांचेच कंत्राट काढण्यात येत आहे. यामुळे उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे आहेत. 

पाचशे मेगावॉट वीजनिर्मिती केंद्रात मागील चार-पाच वर्षांपासून कोळसा हाताळणी विभागात काम करणाऱ्या एकूण सोळा कंत्राटी कामगारांना "आठ महिने काम, चार महिने थांब' अशी स्थिती दरवर्षी येत असल्याने या सोळा कंत्राटी कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर चार महिने उपासमारीची वेळ येते. यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी मोठी कसरत करावी लागते. या दरम्यान चार महिने कंत्राटी कामगार चक्क बेरोजगार होतात. 

फक्त आठ महिने काम

पाचशे मेगावॉट वीज केंद्रातील कोळसा हाताळणी विभागाच्या स्टेकर पॉइंटवर एका कंपनीला क्‍लिनिंगचे काम मिळते. या कामात एकूण सोळा कंत्राटी कामगार तीनही पाळीत काम करीत आहेत. हे कंत्राटी कामगारांचे सकस नियमानुसार भविष्य निधी, ईएसआयसी कपात होत असून सर्व भत्तेसुद्धा कंपनीकडून नियमानुसार मिळत असल्याचे कंत्राटी कामगारांनी सांगितेले. परंतु फक्त आठ महिने काम देऊन चार महिने त्यांना घरी बसविले जात असल्याने यातीलच काही कंत्राटी कामगारांना चार महिने कामासाठी इतरत्र भटकावे लागते. याबाबत अनेकदा कंत्राटी कामगार संघटनांनी पाठपुरावा केला. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. 

संपूर्ण निविदा वर्षांसाठी का नाही

पाचशे मेगावॉट वीज निर्मिती केंद्रात कोळसा हाताळणी विभागातील स्टॅकर क्‍लिनिंग हॉपरच्या कामाचे सोळा कामागारांची निविदा आठ महिन्यांकरिताच का निघते? हे समजण्यापलीकडे आहे, ही निविदा संपूर्ण वर्षांसाठी काढली जावी, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four months unemployment due to non-completion of tender