चारवेळा आले अपयश; मात्र पाचव्यांदा घातली यशाला गवसणी 

success
success

यवतमाळ : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा 2019 च्या निकालात शेतमजुराच्या मुलाने गगनभरारी घेतली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या लाडखेड येथील संदीप ज्ञानेश्‍वर पानतावणे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. हे यश त्यांनी पाचव्या प्रयत्नात संपादन केले असले तरी त्यांच्या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

दारव्हा तालुक्‍यातील लाडखेड येथे आई-वडील शेतमजूर असलेल्या कुटुंबात संदीपचा जन्म झाला. चार भावंडात तो सर्वांत लहान आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले. प्रशासकीय अधिकारी व्हायचे हे त्यांचे स्वप्न होते. यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. संदीपचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण लाडखेड येथील वसंतराव नाईक विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता दारव्हा येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयातून कला शाखेला प्रवेश घेतला. बारावीला असतानाच संदीपने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांकडून एमपीएससी स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळवली. तेव्हाच प्रशासकीय अधिकारी होण्याचा निश्‍चय केला.

अभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रमाने 12 वीला चांगले गुण मिळवून दारव्हा येथील रामरावजी दुधे अध्यापक विद्यालयात प्रवेश मिळविला. 2009 मध्ये डी.एड. ही अध्यापक पदविका चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. 2010 मध्ये झालेल्या प्राथमिक शिक्षक भरतीच्या सीईटी स्पर्धेतही उत्तीर्ण होऊन जिल्हा परिषद यवतमाळमध्ये शिक्षण सेवक म्हणून निवड झाली. सीईटीसारखी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे एमपीएसीद्वारे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आणखी बळकट झाले. 2011 मध्ये जिल्हा परिषद शाळा, माळवाकद पंचायत समिती महागाव याठिकाणी शिक्षणसेवक म्हणून रुजू झाले. एमपीएससीची परीक्षा देण्याकरिता पदवी पात्रता आवश्‍यक आहे. म्हणून नोकरी सांभाळत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात 2014 मध्ये बी.ए. पूर्ण केले. पदवी पूर्ण होताच खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात झाली. त्याचवेळी त्यांचे शिक्षकमित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. 2015, 2016 व 2017 ला संदीप राज्यसेवेची पूर्वपरीक्षा नापास झाले.

यादरम्यान अभ्यासातील त्रुटी शोधून अपयशातून खचून न जाता अभ्यास सुरूच ठेवला. 2018 ची राज्यसेवा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली व मुख्य परीक्षेला संधी मिळाली. 2018 च्या मुख्य परीक्षेत काही गुणांनी मुलाखतीची संधी हुकली. मग पुन्हा एकदा जोमाने तयारी करून 2019 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा दिली. यावेळी मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले व मुलाखतीला पात्र ठरले. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा 2019 च्या निकालात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला येणाऱ्या अपयशातून खचून जाऊ नका. जिल्हा परिषद शाळा, ग्रामीण भागातील विद्यार्थी असा कुठलाही न्यूनगंड मनी न बाळगता आपल्या अभ्यासात होणाऱ्या त्रुटी शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा व अभ्यासात सातत्य ठेवावे. नक्कीच यश पदरी पडेल. 
-संदीप पानतावणे, 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com