esakal | शाब्बास रे मुला! चार वर्षांच्या राजवीरने अनुभवला झीपलाइनचा थरार
sakal

बोलून बातमी शोधा

धारणी : झीपलाइनचा खेळ खेळताना राजवीर धोत्रे.

चार वर्षांच्या राजवीर धोत्रे या चिमुकल्याने झीपलाइन हा खेळ बघितला. आपल्या आई-वडिलांना हा खेळ खेळण्यासाठी त्याने हट्ट केला, मात्र यामध्ये धोका असल्याने सुरुवातीला आजी व आईवडिलांनी त्याची मागणी नाकारली. परंतु सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था असल्यामुळे या चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी होकार दिला आणि त्याने झीपलाइनचा थरार अनुभवला.

शाब्बास रे मुला! चार वर्षांच्या राजवीरने अनुभवला झीपलाइनचा थरार

sakal_logo
By
प्रतीक मालवीय

धारणी (जि. अमरावती) : सध्या कोरोनामुळे चिखलदरा पर्यटनस्थळावर पर्यटकांची दरवर्षीप्रमाणे गर्दी नाही; पण शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी विदर्भातील पर्यटकांची येथे चांगलीच गर्दी दिसून येत आहे.

अनेक साहसी खेळांना याठिकाणी प्रोत्साहित केले जात असून हृदयाचे ठोके चुकविणाऱ्या साहसी झीपलाइनचा थरार अमरावतीच्या राजवीर शहाजी धोत्रे या चिमुकल्याने करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.

अमरावतीसह अकोला, नागपूर यांसह अन्य जिल्ह्यांतील अनेक पर्यटक चिखलदऱ्याला भेट देऊन आठवड्याची सुटी एन्जॉयमेंट करताना दिसत आहेत. चिखलदरा येथे पर्यटनवाढीच्या दृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या असून त्यामध्ये जागतिक दर्जाच्या स्कायवॉकचा समावेश आहे. सध्या हे कामही प्रगतिपथावर आहे. याचबरोबर चिखलदऱ्यात अनेक साहसी खेळ मागील चार-पाच वर्षांपासून सुरू झालेत. त्यामध्ये झीपलाइन नामक साहसी खेळाचासुद्धा समावेश आहे.

साहसी खेळाचा थरार

चिखलदरा येथील आमझरी येथे ही व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये उंच पर्वतावरून खाली खोल दरीत लांब दोरीच्या साहाय्याने खाली सोडण्यात येते, यात सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था येथील व्याघ्रप्रकल्पाने केलेली आहे. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने हा साहसी खेळ सुरू करण्यात आला आहे. झीपलाइन हा साहसी खेळ असल्याने व उंच पर्वतावरून लांब दूर दरीत उतरत असल्याने अनेकजण हा थरारक खेळ खेळण्यास तयार होत नाहीत.

जाणून घ्या  : रात्री शांत झोप लागत नाही? मग हे उपाय करा आणि घ्या 'चैन की निंद'

आईवडिलांनी मुलाचा हट्ट पुरविला

अमरावतीच्या अवघ्या चार वर्षांच्या राजवीर धोत्रे या चिमुकल्याने हा साहसी खेळ खेळून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. राजवीर हा आईवडील व आजीसोबत चिखलदरा येथे पर्यटनासाठी आला होता. त्याने झीपलाइन हा खेळ बघितल्यानंतर आपल्या आई-वडिलांना हा खेळ खेळण्यासाठी हट्ट केला, मात्र यामध्ये धोका असल्याने सुरुवातीला आजी व आईवडिलांनी त्याची मागणी नाकारली. परंतु सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था असल्यामुळे या चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी होकार दिला आणि त्याने झीपलाइनचा थरार अनुभवला.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)