esakal | आठ पोते सुगंधित तंबाखूची होत होती वाहतूक; पोलिसांनी जप्त केले फक्‍त तीन पोते, बाकी?
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी जप्त केलेले वाहन

वाहनधारकाची कसून चौकशी केली तर सुगंधित तंबाखूचा व्यापार करून मोठी रक्कम कमविणारे अनेक मोठे व्यापारी गळाला लागू शकतात. देसाईगंज व आरमोरी ही दोन शहरे सुगंधित तंबाखूच्या तस्करीची केंद्रे असल्याची चर्चा आहे.

आठ पोते सुगंधित तंबाखूची होत होती वाहतूक; पोलिसांनी जप्त केले फक्‍त तीन पोते, बाकी?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीचा परवाना काढून भाजीपाल्याच्या वाहनातून चक्क सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात आहे. कोरची पोलिसांनी अशाच एका वाहनातून 80 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. कारण, आठ पोते सुगंधित तंबाखू पैकी केवळ तीन पोते तंबाखू जप्त करण्यात आला आहे. यामुळे उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहेत.

देसाईगंज येथील भाजीपाला व्यापारी लकी उर्फ लंकेश हटनागर हा एमएच 36- एए 399 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून राजनांदगाव येथून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच कोरची पोलिसांनी सायंकाळी नाकाबंदी करून वाहन अडविले. यावेळी वाहनात 80 हजार रुपये किमतीचा "ईगल' व "मजा' नामक सुगंधित तंबाखू जप्त केला. शिवाय तीन लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहनही ताब्यात घेतले.

विदर्भाच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गोडबोले, पोलिस उपनिरीक्षक कोंडूभैरी, श्रीमंगल यांच्यासह शिपाई निशांत व सचिन यांनी ही कारवाई केली. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. याप्रकरणी वाहनधारकाची कसून चौकशी केली तर सुगंधित तंबाखूचा व्यापार करून मोठी रक्कम कमविणारे अनेक मोठे व्यापारी गळाला लागू शकतात. देसाईगंज व आरमोरी ही दोन शहरे सुगंधित तंबाखूच्या तस्करीची केंद्रे असल्याची चर्चा आहे.

नेमका तंबाखू किती होता?

पोलिसांनी पकडलेल्या वाहनात आठ पोते सुगंधित तंबाखू होता. परंतु, तो केवळ तीन पोत्यात भरून कारवाई करण्यात आली, अशी चर्चा आहे. आठ पोत्यांतील तंबाखूची किंमत बाजारभावानुसार तीन लाख 84 हजार रुपये एवढी होते. मात्र, तीनच पोते तंबाखू दाखविल्याने ही किंमत 80 हजारांवर आली असे सांगितले जाते. त्यामुळे पोलिसांना नेमका किती तंबाखू आढळला व जप्त किती केला याविषयी उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहेत.