esakal | नागरिकांनो सावधान! तोतया बँक अधिकाऱ्यांचा धुमाकूळ; गोपनीय माहिती दिल्यास व्हाल कंगाल

बोलून बातमी शोधा

null

नागरिकांनो सावधान! तोतया बँक अधिकाऱ्यांचा धुमाकूळ; गोपनीय माहिती दिल्यास व्हाल कंगाल

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : ग्रामीण भागात तोतया बॅंक अधिकाऱ्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. सुशिक्षितांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. तोतया बॅंक अधिकाऱ्याने दर्यापूरच्या साईनगर येथील मनोहर हरिभाऊ मुळे (वय 67) यांच्या खात्यामधून 81 हजार 150 रुपये परस्पर दुसरीकडे वळती केले.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

दर्यापूर येथील श्री. मुळे यांना 23 जानेवारी 2021 रोजी एका व्यक्तीने फोन केला. फोन करणाऱ्याने भारतीय स्टेट बॅंकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. मुळे हे त्यांच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डचा वापर का करीत नाही, असे विचारले. त्यानंतर क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक मागितला. शिवाय आलेला ओटीपीसुद्धा मुळे यांनी तोतया बॅंक अधिकाऱ्यास शेअर केला.

त्यानंतर 16 मार्च 2021 रोजी एका व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने बॅंक ओव्हर ड्यू म्हणून 81 हजार 150 रुपये बाकी आहे. कारण 23 जानेवारी रोजी त्यांनी ऑनलाइन खरेदी केली, असे तोतयाने सांगितले. वास्तविक पाहता दर्यापूर येथील मनोहर मुळे यांनी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन खरेदी या काळात केली नव्हती.

त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी दर्यापूर येथे भारतीय स्टेट बॅंकेमध्ये जाऊन खातेउतारा मागितला असता त्यात 27 एप्रिल रोजी श्री. मुळे यांच्या बॅंक खात्यामधून 81 हजार 150 रुपयांची रक्कम परस्परच काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्री. मुळे यांनी दर्यापूर ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा 'गेम' करण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

निवृत्त प्राचार्यांच्या नावे 20 हजार लुबाडले

मोर्शीच्या नंदस्मित कॉलनी येथील संजय माणिकराव घुलक्षे (वय 45) यांना अनोळखी व्यक्तीने त्यांच्या ओळखीतील प्राचार्यांच्या नावाने फेसबुकवर चॅटिंग केली. मॅसेजमध्ये आपण आयसीयूमध्ये दाखल असून पैशाची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी एक मोबाईल नंबर दिला. रुग्णालयातून फोनसुद्धा करता येत नसल्याचे सांगितले. प्राचार्यांना मदत व्हावी म्हणून श्री. घुलक्षे यांनी दिलेल्या क्रमांकावर 20 हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याच व्यक्तीने पुन्हा काही दिवसांनी 15 हजार रुपयांची मदत मागितली. यावेळी श्री. घुलक्षे यांना संशय आला. त्यांनी मोर्शी पोलिसांत तक्रार दिल्याने तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

संपादन - अथर्व महांकाळ