ग्रेटच म्हणावा... "तो' तोतया डॉक्‍टर मोठ्या रुग्णालयांत "आरएमओ'सुद्धा होता! 

medical officer
medical officer

अमरावती : अमरावतीसह नागपूर आणि यवतमाळ येथील काही मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये तोतया एम.बी.बी.एस., एम.डी. डॉक्‍टरने केवळ मदतनीस म्हणूनच नव्हे तर रात्रपाळीत आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी) म्हणूनही सेवा दिल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. 

संबंधित तोतया डॉक्‍टरने ज्या रुग्णालयात आतापर्यंत सेवा दिली त्यापैकी काही डॉक्‍टरांची तपास अधिकाऱ्यांनी भेट घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. परंतु पोलिस त्याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगत आहेत. कारण ज्यांच्याकडे या तोतया डॉक्‍टर डबलेने आरएमओ म्हणून सेवा दिली, तेव्हा एकाही डॉक्‍टरने तो कोणत्या बॅचचा विद्यार्थी आहे हे तपासण्याचे भान ठेवले नाही, हे विशेष! 

दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी, 6 जुलै रोजी पुन्हा किरणनगर नंबर-2 येथील डॉ. अविनाश डबले याच्या खासगी रुग्णालयाची दुसऱ्यांदा झडती घेतली. तेथून इंजेक्‍शन, सलाईन बॉटलसह, रक्तदाब व वजन तपासणीचे अत्याधुनिक यंत्र, काही औषधी बॉटल जप्त केल्या. त्याच्या रुग्णालयात रक्त, लघवी तपासणीसुद्धा झाली. त्याचेही रिपोर्ट या डॉक्‍टरने तयार करून अनेकांना दिले. शांतिनगर, बेनोडा व सद्य:स्थितीत किरणनगर परिसरात रुग्णालय थाटून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डबले याने दोन वर्षांमध्ये जवळपास पाचशेपेक्षा अधिक रुग्णांना तपासून उपचार केले. त्याने रुग्णालयाच्या आत एक रेटबोर्डही लावला होता. त्यावर मेडिकल सर्टिफिकेट, सर्जिकल फिटनेस प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी पाचशे रुपये, होम व्हिजिट एक हजार रुपये याप्रकारे दर आकारले होते. त्याने नामांकित डॉक्‍टर रुग्णांना देतात त्या फाईल्स, प्रमाणपत्रे, लेटरपॅड कोठून छापले याची माहिती पोलिसांना दिली नाही. 

डॉक्‍टर साहेब गेले कुठे? 

तोतया डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तो तीन दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीत आहे. तरीही बरेच रुग्ण उपचारासाठी त्याच्या किरणनगर येथील रुग्णालयात जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी करीत आहेत. जप्तीची कारवाई करणाऱ्या पोलिसांकडेच अनेकांनी डॉक्‍टर कुठे आहेत याची विचारणा केली. 

रुग्णालयाला सील ठोकणे लांबणीवर 

सोमवारी (ता. सहा) पोलिसांना जिल्हाशल्य चिकित्सकांचा अहवाल प्राप्त झाला. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई व आरोग्य विद्यापीठ नाशिक येथून पोलिसांनी माहिती घ्यावी. आवश्‍यकता वाटल्यास स्वत:च्या स्तरावर कलमांची तीव्रता वाढवावी, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे तोतया डॉक्‍टरच्या किरणनगर येथील रुग्णालयास सील ठोकण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अनेकांच्या कोरोना चाचण्याही केल्या 

सर्वत्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना बरेच खासगी रुग्णालय बंदही होते. त्या काळात या तोतया डॉक्‍टरने काहींच्या कोरोना चाचणी करून, त्यांना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com