esakal | बुलेट बक्षीस लागल्याचे सांगून तरुणास गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

बुलेट बक्षीस लागल्याचे सांगून तरुणास गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लाखनी (जि. भंडारा) : बुलेट गाडी बक्षीस लागल्याचे सांगून युवकाला तब्बल 1 लाख 84 हजार रुपयांनी गंडविण्यात आले.
तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आनंद वासुदेव चोपकर (वय 24, रा. मुरमाडी, सावरी) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. 14 ऑगस्टला आनंदच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. या कॉलदरम्यान झालेल्या संभाषणात समोरच्या व्यक्‍तीने तुम्हाला बुलेट गाडी बक्षीस लागली, असे सांगितले. मात्र, ही गाडी तुम्हाला मिळावी यासाठी रजिस्ट्रेशन फी, डाक्‍युमेंट चार्जेस, जीएसटी व एनओसी आदींसाठी काही रक्कम भरावी लागेल. त्यानंतर ही गाडी तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे सांगितले. मोबाईलवर संभाषण साधलेल्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार 14 ऑगस्टपासून आनंद याने टप्प्याटप्प्याने 1 लाख 84 हजार रुपये संबंधित अनोळखी व्यक्तीने दिलेल्या बॅंक खात्यात भरले. संपूर्ण रक्कम भरल्यानंतर त्याने मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आनंद याने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. आनंदच्या मोबाईलवर संपर्क साधण्यासाठी वापरण्यात आलेले दोन अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांक व बॅंक खाते क्रमांक यावरून पोलिस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास ठाणेदार श्री. मंडलवार करीत आहेत. ऑनलाइन पद्धतीने तसेच भ्रमणध्वनीवरून माहिती काढून फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिस जनजागृती करीत असले, तरी अनेक जण आपल्या विवेकबुद्धीचा वापर न करता फक्त लोभापायी अशा जाळ्यात आपसूक फसत असल्याचे दिसते.

loading image
go to top