
अचलपूर : आपल्यातील अनेक जण शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जातात. तेथील लाइफस्टाइल त्यांना भुरळ घालते व त्यामुळे अनेकजण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. तेथील चांगल्या पगाराची नोकरी सोडणे हा अनेकांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. पण काही जण याला अपवाद आहेत. येथील रवी गुप्ता या युवकाने परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून परतवाड्यात स्वतःचा पाइपचा उद्योग उभारून युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.