मेडीगड्डा प्रकल्पापासून गडचिरोली जिल्ह्याला कमी लाभ

सिरोंचा : येथे उभारण्यात येत असलेला मेडीगड्डा प्रकल्प.
सिरोंचा : येथे उभारण्यात येत असलेला मेडीगड्डा प्रकल्प.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍याच्या तीनही बाजूंनी इंद्रावती, प्राणहिता, गोदावरी या प्रचंड मोठ्या व बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. यातील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने प्रचंड मोठा मेडीगड्डा सिंचन प्रकल्प पूर्ण केला आहे. मात्र, तालुक्‍यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ होण्याऐवजी हानीच अधिक होणार असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्‍यात बारमाही वाहणाऱ्या या तीनही नद्यांवर महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत एकही धरण किंवा उपसा सिंचन योजनेची निर्मिती केली नाही. तेलंगणा राज्य वेगळे होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तेलंगणा राज्याने दूरदृष्टी दाखवत अवघ्या दोन ते अडीच वर्षांत वडदम, पोचमपली गावाजवळ गोदावरी नदीवर 80 दरवाजे असलेल्या या प्रचंड मोठ्या धरणाचे बांधकाम पूर्ण केले. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. या मेडिगड्डा धरणाच्या पाण्याचा तेलंगणा राज्याला 100 टक्‍के फायदा होणार असून तेलंगणा राज्यातील 45 लक्ष हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार. तसेच त्या राज्यातील पिण्याच्या पाण्याची 80 टक्‍के समस्या दूर होणार आहे. मेडीगड्डा धरणाचे पाणी पोचमपल्लीपासून रेगुंठापर्यंत बॅक वॉटर राहणार आहे. या बॅक वॉटरचा लाभसुद्धा तेलंगणालाच होणार आहे. रेगुंठापासून कालेश्‍वरपर्यंत प्राणहिता नदीकाठावर तेलंगणाने मोठमोठे पाइप लावून हे पाणी तिकडच्या तलावात साठविण्यात येत आहे. परंतु, सिरोंचा तालुक्‍यात 50 वर्षांपासून रेगुंठा उप सिंचन योजना, पेंटीपाका उप जल सिंचन योजना, झिंगानूर-इंद्रावती उप जल सिंचन योजना या महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना रखडल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना काहीच लाभ होणार नाही. सिरोंचा तालुक्‍यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या असत्या तर मेडिगड्डा धरणाने अडलेले पाणी येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी वापरता आले असते.
बाहुबलीचे बळ
कोट्यवधी रुपये कमावणारा मेगा सुपरहिट झालेला बाहुबली हा दाक्षिणात्य चित्रपट अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाचा मेडीगड्डा प्रकल्पाशी संबंध नसला, तरी चित्रपटाच्या नावाचा मात्र आहे. बाहुबली चित्रपटातील नायकाला प्रचंड शक्तिशाली दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी लांब अंतरापर्यंत पोहोचविण्यासाठी तेलंगणा सरकारने अशाच बाहुबलीचा वापर केला आहे. हा बाहुबली म्हणजे कालेश्‍वर येथील कनेपल्ली येथे बसवण्यात आलेला मोठा पंप आहे. बाहुबली नामक या महाकाय पंपाच्या माध्यमातून रोजचे 2 टीएमसी पाणी लिफ्ट करून ते अण्णाराम येथील धरणात सोडण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com