esakal | निसर्गाचा वरदहस्त असलेला गडचिरोली जिल्हा वाघांच्या प्रतीक्षेत!
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळ्या झालेल्या गडचिरोली जिल्ह्याने कोणत्याही क्षेत्रात फारशी भरीव प्रगती केल्याचे दिसून येत नाही. खरेतर या जिल्ह्यावर निसर्गाचा वरदहस्त असतानाही वनपर्यटन, वनोपजावर प्रक्रिया उद्योग त्यातून रोजगार निर्मिती या बाबीही हा जिल्हा साधू शकला नाही.

निसर्गाचा वरदहस्त असलेला गडचिरोली जिल्हा वाघांच्या प्रतीक्षेत!

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : कधीकाळी चंद्रपूर जिल्ह्याचाच भाग असलेला गडचिरोलीचा परिसर २६ ऑगस्ट १९८२ मध्ये वेगळा होत स्वतंत्र जिल्हा म्हणून नकाशावर अस्तित्वात आला. तेव्हापासून सुरू झालेला या दोन्ही जिल्ह्याचा प्रवास अतिशय वेगळा ठरला आहे. चंद्रपूर सशासारखा टुणटुण उड्या मारत कितीतरी अंतर लांब गेला, तर गडचिरोली कासवासारखा हलतडुलत सावकाश पुढे जात राहिला. ही बाब निसर्ग संवर्धनाच्या बाबतीतही जाणवते. सारखा जंगल प्रकार, सारखीच जैवविविधता असताना चंद्रपूर जिल्ह्यात आता तब्बल पावणे दोनशे (१७५) वाघ आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यातील वाघांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या या जिल्ह्यातील वाघ वाढणार कधी, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो आहे.

१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळ्या झालेल्या गडचिरोली जिल्ह्याने कोणत्याही क्षेत्रात फारशी भरीव प्रगती केल्याचे दिसून येत नाही. खरेतर या जिल्ह्यावर निसर्गाचा वरदहस्त असतानाही वनपर्यटन, वनोपजावर प्रक्रिया उद्योग त्यातून रोजगार निर्मिती या बाबीही हा जिल्हा साधू शकला नाही.

उलट कधीकाळी शंभरावर असलेले वाघ हा जिल्हा गमावून बसला. वनक्षेत्रही कमी होत आहे. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्याने सुरुवातीला कोळसा, सिमेंटच्या, विजेच्या भरवशावर वेगवान प्रगती केली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे या जिल्ह्याला व्याघ्रदर्शनातून मिळणारा महसूल कोळशातून मिळणाऱ्या पैशांनाही मागे टाकत आहे. त्यासाठी योग्य धोरण आखत येथे वाघ व वन्यजीवांचे संवर्धन करण्यात आले. त्यांची संख्या वाढवत पर्यटनाचेही नियोजन करण्यात आले. दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात चपराळा, भामरागड, प्राणहिता ही अभयारण्ये आहेत,

कोलामार्कासारखे जगातील दुर्मिळ रानम्हशींचे संरक्षण क्षेत्र आहे. कमलापूरचा हत्ती कॅम्प, वेंकटापूरचे चमत्कारिक जलकुंड, पुरातन जंगल असलेले ग्लोरी ऑफ आलापल्ली असतानाही योग्य व्यवस्थापन, विकास व पर्यटनाचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे गडचिरोली वनविभागाच्या पाच उपविभागांपैकी वडसा उपविभाग वगळता इतरत्र क्‍वचितच वाघ दिसतात. चंद्रपूरातील ५० वाघांच्या स्थानांतराचा विचार सुरू असताना ही संधी गडचिरोली जिल्ह्याला साधता येईल का, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

पर्यटन हाच पर्याय....
गडचिरोली जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी येथे मोठ मोठे उद्योग उभारून येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करण्याची अजिबात आवश्‍यकता नाही. निसर्गाने भरभरून दिलेल्या या जिल्ह्यात घनदाट वन, दुर्मिळ वन्यजीवांसह अनेक आश्‍चर्यकारक स्थळे आहेत, समृद्ध आदिवासी संस्कृती आहे. त्यामुळे केवळ पर्यटनाच्या बळावर या जिल्ह्याची सहज प्रगती होऊ शकते. सोबतच वनोपजावर आधारित लघू प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास व त्यांना चांगली बाजारपेठ मिळाल्यास हा जिल्हा वेगाने प्रगती करू शकतो. पण, त्यासाठी प्रशासकीय व राजकीय इच्छाशक्‍तीची आवश्‍यकता आहे.

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

गडचिरोली जिल्हा वाघांचा चांगला अधिवास
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त वाघ गडचिरोली जिल्ह्यात हलविण्याचा पर्याय योग्यरीतीने अमलात आणावा लागेल. घनदाट व विस्तीर्ण वन असलेला गडचिरोली जिल्हा वाघांचा चांगला अधिवास होऊ शकतो. त्यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे. खरेतर हे प्रयत्न फार पूर्वीच व्हायला हवे होते. पण, आताही वेळ गेलेली नाही. ''
किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र राज्य
 

संपादन - स्वाती हुद्दार

loading image