पावसाने रडविले...पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावले

Gadchiroli Farmers wait for rains
Gadchiroli Farmers wait for rains

गडचिरोली : तालुक्‍यातील अनेक गांवामध्ये गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने घाईघाईने धान पऱ्ह्याची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मनावर चितेंचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी धान पऱ्ह्यांची वाढ थांबली असून पऱ्ह्यांना मरणकळा सुरू झाल्या आहेत. परिणामी सिंचनाची सोय असलेले शेतकरी मोटारपंपाच्या साहाय्याने पऱ्ह्यांना पाणी देत आहेत; तर सिंचनाची सोय नसलेले शेतकरी आभाळाकडे नजर ठेवून बसले आहेत. जर का पावसाने लवकरच हजेरी लावली नाही, तर पऱ्हे करपून त्यांची माती होईल अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.

पऱ्ह्यांची वाढ खुंटली

यावर्षी सर्वत्र खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मृग नक्षत्रात 10 ते 11 जून रोजी व त्यानंतर अधूनमधून मेघगर्जनेसह दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, मृगधारा फारशा बरसल्याच नाहीत. आता सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातही जिल्ह्यात काही ठिकाणे वगळता पाऊस झालेला नाही. सुरुवातीला खरिपातील धान पेरणीयोग्य पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी धानपऱ्ह्यांची पेरणी केली. जमिनीत ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी पेरलेल्या धानाचे कोंब वर येऊ लागले असताना गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरलेल्या धानाची वाढ थांबली आहे.

दुबार पेरणीचे संकट

आवत्या व पऱ्हे हळूहळू सुकू लागले असल्याने दुबार पेरणीचे संकट येईल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षीचा हंगाम चांगला होणार, या आशेने शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागले असताना पावसाने दडी मारल्याने ते चिंतातूर झाले आहेत. एक-दोन दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार, अशी भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com