Gadchiroli: गृहमंत्री, पालकमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हा गाठत केले शूर पोलिसांचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहमंत्री, पालकमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हा गाठत केले शूर पोलिसांचे अभिनंदन

गृहमंत्री, पालकमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हा गाठत केले शूर पोलिसांचे अभिनंदन

गडचिरोली : शनिवारी गडचिरोली- छत्तीसगड राज्याच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत सी-६० जवानांनी २६ नक्षल्यांना कंठस्नान घातले. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड झोनचा प्रमुख आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेला जहाल नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे मारला गेला. त्यामुळे पोलिसांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार (ता. १५) गडचिरोली जिल्ह्यात येत गडचिरोली पोलिस विभागाचे भरभरून कौतुक केले.

यावेळी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, यापूर्वीही पोलिस विभागाकडून मोठ्या प्रमाणात नक्षल्यांना रोखण्यात पोलिस विभागाला यश आले असून या विभागाची राज्यात शांतता निर्माण करण्यात मोठी भूमिका आहे. पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना ठार करत अतुल्य धाडसाचा परिचय दिला आहे. त्यातही जहाल नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याला ठार करत नक्षल चळवळीला मोठाच हादरा दिला आहे. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असेही ते म्हणाले. या भेटीत त्यांनी यापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींची भेट घेतली व त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारून अनुकंपामधील भरती तसेच त्यांच्या इतर मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली.

हेही वाचा: सातारा : लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; एकास सक्तमजुरी

तसेच यावेळी आयोजित सी-६० जवानांच्या अभिनंदन कार्यक्रमात सहभागी होत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मंचावर अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान)छेरींग दोरजे, पोलिस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे आदी उपस्थित होते.

गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोहचताच त्यांनी शहीद स्तंभावर आदरांजली वाहिली. त्यानंतर पोलिसांशी संवाद साधत त्यांनी जवानांच्या उल्लेखनीय कामगिरीचे व धाडसाचे कौतुक केले. जहाल नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याने तीन राज्यांना फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान राज्याचे नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिसांचे कौतुक करत जिल्हा नियोजनमधील निधीतून ५१ लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केली. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तसेच या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसला असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: कऱ्हाड : साखर आयुक्तांच्या बैठकीवर बहिष्कार

जबरदस्त पराक्रम...

या चकमकीत पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे आपण प्रत्यक्ष पाहिली असून ही शस्त्रे अत्याधुनिक होती. इंसास रायफलसह यूबीजीएलसारखी अत्याधुनिक शस्त्रे बघता मिलिंद तेलतुंबडेचे सुरक्षा कडे किती भक्कम असेल याची कल्पना येते. मात्र, त्याच्या सुरक्षेचा अभेद्य कडा तोडत पोलिस जवानांनी त्याला ठार करून जबरदस्त पराक्रम केल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या चकमकीत जखमी झालेले चार जवान आता बरे असले, तरी आवश्यकता पडल्यास त्यांना उपचारासाठी मुंबईच्या अत्याधुनिक रुग्णालयात पाठविण्याची सोय करण्याच्या सूचना आपण डॉक्टरांना दिल्याचेही ते म्हणाले.

loading image
go to top