
Gadchiroli : अखेर पेपरमील परिसरातील बिबट्या जेरबंद
गडचिरोली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत मार्कंडा (कं.) परिक्षेत्रातील नियतक्षेत्र मार्कडामधील ईल्लूर तसेच पेपरमिल परिसरातील मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या नर बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.
या उपद्रवी बिबट्याला जेरबंद करण्याबाबतचे आदेश मुख्य वन्यजीव रक्षक, नागपूर यांच्याकडून प्राप्त करण्यात आले. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार व वरिष्ठांच्या सूचनेनुसार पेपरमिल परिसरात बिबट्याचा जास्त वावर असलेल्या ठिकाणी 3 पिंजरे लावण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता पेपरमिल कॉलनीलगत लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट अडकला. जेरबंद बिबट्याला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले व त्याच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे.
त्याचबरोबर पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर डुकरे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली आहे व तसा अहवाल दिला आहे. मागील काही दिवसांपासून ईल्लुर तसेच पेपरमिल परिसरात या बिबट्याने अनेकांवर हल्ले केले होते. या बिबट्याच्या हल्ल्यात महिला व मुले जखमी झाली. एक मुलगा व एका वृद्ध व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. या जेरबंद बिबट्यास निसर्ग अधिवासात मुक्त करावे किंवा गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे हलविण्यात यावे, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवार (ता. 4) एसओपी समितीची मार्कंडा (कंसोबा) वनपरिक्षेत्र कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत जेरबंद बिबट्यास निसर्ग अधिवासात मुक्त करणे धोकादायक असल्याने या बिबट्यास गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त यांच्याकडे जेरबंद बिबट्यास गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी प्राप्त होताच जेरबंद केलेल्या बिबट्यास गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्यात येईल. ही कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.\
सभेला एसओपी समितीचे अध्यक्ष तथा उपवनसंरक्षक सी. आर. तांबे तसेच सदस्य उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव) राहुलसिंग टोलिया, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, जिल्हा परिषद सदस्य रूपाली पंदीलवार, सरपंच वनश्री चापले, क्रेन्स (कंझर्वेशन, रिसर्च अॅण्ड नेचर एज्युकेशन सोसायटी) च्या सचिव अंजली कुळमेथे आदींची उपस्थिती होती.