गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे पडले होते नक्षलवाद्यांना भारी

शैलेश बलकवडे
शैलेश बलकवडे

गडचिरोली : करड्या शिस्तीच्या, कठोर शासनप्रणाली असलेल्या पोलिस विभागात अतिशय हसतमुख चेहरा ठेवत शांत, संयमी मनाने काम करणारे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे त्यांच्या कारकिर्दीत नक्षलवाद्यांना भारी पडले होते. नक्षल्यांच्या दिग्गज नेत्यांपासून दलमचे वरिष्ठ कमांडर ते विविध जहाल नक्षलवाद्यांना त्यांच्या नेतृत्वात ठार व्हावे लागले. शरणागती पत्करत गुडघेही टेकावे लागले.

आता त्यांची कोल्हापूरला बदली झाली असली; तरी त्यांच्या कारकिर्दीतील सुखद आठवणी पोलिस विभागांसह नागरिकांमध्येही आवडीने चर्चिल्या जात आहेत. आता मुंबई परिमंडळ १० चे उपायुक्‍त अंकित गोयल हे गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक असून त्यांच्याकडूनही अशाच कामगिरीची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात अतिशय संयमाने, नियोजनबद्धरीत्या नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले. त्यांनी जुलै २०१८ मध्ये पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात २० नक्षली चकमकीत ठार झाले, ५५ नक्षल्यांना अटक करण्यात आली, तर ४३ नक्षल्यांनी शरणागती पत्करली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या कार्यकाळात नर्मदाक्‍का आणि तिचा पती किरणकुमार या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या दोन जहाल नक्षल्यांना अटक करण्यात आली.

जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला केली अटक

जिल्ह्यातील आजवरच्या ४० वर्षांच्या नक्षल चळवळीच्या काळात कुणीही नर्मदाक्‍काला अटक करू शकले नव्हते. मात्र, शैलेश बलकवडे यांनी नर्मदाक्‍काला अटक केली. हे त्यांचे अभूतपूर्व यश होते. त्यांच्याच कार्यकाळात २ डीव्हीसी चकमकीत ठार झाले, दोघांना अटक झाली, तर ४ जणांनी आत्मसमर्पण केले. २ दलम कमांडरना कंठस्थान घातले गेले, तर दोघांना शरणागतीचा मार्ग स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, अख्ख्या चातगाव दलमला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्याचा विक्रमही शैलेश बलकवडे यांच्या नावावर आहे. डीव्हीसी सृजनक्‍का व रामको या प्रमुख नक्षली नेत्या बलकवडे यांच्याच कार्यकाळात ठार झाल्या.


बलकवडे यांची यशस्वी कारकीर्द

चातगाव दलम कमांडर दिनकर गोटा यास झालेली अटक आणि विलास कोल्हा याने केलेले आत्मसमर्पण या दोन घटनाही महत्त्वपूर्ण होत्या. मागच्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये एकाही जवानाला प्राण गमवावा लागला नाही, यासाठी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पोलिस दलाचे अभिनंदन केले होते. ही बाबदेखील शैलेश बलकवडे यांच्या यशस्वी कारकिर्दीची नोंद घेणारी ठरली.

दुर्गम भागात केली विकासकामे

एकीकडे नक्षल चळवळ खिळखिळी करीत असताना शैलेश बलकवडे यांनी दुर्गम भागातील नागरिकांच्या हितासाठी विकासकामे करण्यावरही भर दिला. दुर्गम भागात रस्ते, पूल व इतर सुविधा व्हाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने गृहविभागाकडे पाठपुरावा केला. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरील पुलाला मिळालेली मंजुरी हे त्यांच्या प्रयत्नांचेच फलित आहे. असे अनेक भीमपराक्रम करणारे शैलेश बलकवडे तेवढेच विनयशील होते. त्यांनी आपल्या मृदू स्वभावाने अतिदुर्गम भागांतील आदिवासी बांधवांचीही मने जिंकून घेतली होती. या जिल्ह्याचे नेतृत्व कसे करावे, याचा जणू वस्तुपाठच त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे नवे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडूनही जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.


अनोखे "कॅप्टन कूल'

भारतीय क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रचणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला "कॅप्टन कूल' म्हणून ओळखले जाते. कोणत्याही परिस्थितीत आपले संतुलन ढासळू न देता तो अतिशय शांतपणे, संयमाने भारतीय संघाचे नेतृत्व करायचा. शैलेश बलकवडे यांच्या स्वभावातही धोनीचे असे अनोखे गुण आहेत. एकीकडे प्रत्येकाशी शांततेने, संयमाने आणि आपुलकीने बोलताना, नागरिकांना विश्‍वासात घेऊन अनेक सेवाकार्य, मदतकार्य तडीस नेताना दुसरीकडे नक्षल्यांविरोधात तेवढेच आक्रमक धोरण त्यांनी राबविले. धोनीप्रमाणेच आपल्यावरची टीकासुद्धा त्यांनी शांतपणेच सहन केली. त्यामुळे तेही पोलिस विभागाचे "कॅप्टन कूल' आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com