esakal | आठवडीबाजाराला जायचंय...चला गडचिरोलीच्या जंगलात
sakal

बोलून बातमी शोधा

एटापल्ली : गुरुपल्ली गावालगतच्या जंगलात भरलेला आठवडी बाजार.

एटापल्ली तालुक्‍यात मुंबई येथून आलेल्या 10 प्रवाशांनी ग्रामस्थांची झोप उडविली आहे. हे सर्व जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यानंतर ग्रामस्थांकडून अचानक अनेक ठिकाणी जंगलात बाजार भरविला जात आहे.

आठवडीबाजाराला जायचंय...चला गडचिरोलीच्या जंगलात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एटापल्ली (जि. गडचिरोली) : नक्षल घटनांमुळे अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कधी काय होईल, याचा नेम नाही. अनेकदा आठवडी बाजारातील गर्दीचा आडोसा घेऊन नक्षलवाद्यांनी पोलिसावर हल्ले केले. यामुळे कित्येक गावात नक्षल दहशतीमुळे आठवडी बाजाराचीच जागा बदलावी लागली आहे.

कुठे सुरक्षेच्या कारणावरून सशस्त्र पोलिसाच्या सुरक्षेखाली बाजार भरविला जात आहे. मात्र, एटापल्ली तालुक्‍यातील ग्रामस्थांवर चक्क जंगलात बाजार भरवण्याची वेळ आली आहे. ती नक्षलवाद्यांच्या दहशतीने नव्हे तर कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे.

एटापल्ली तालुक्‍यात मुंबई येथून आलेल्या 10 प्रवाशांनी ग्रामस्थांची झोप उडविली आहे. हे सर्व जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून अनेक गावांत बाहेरच्या लोकांना गावबंदी करण्यात आली आहे. तालुका मुख्यालयात गेल्या महिनाभरापासून कोरोना संसर्गामुळे संचारबंदी लागू असल्याने शासनाने बाजार भरविण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही सर्वत्र आठवडी बाजार बंद होते.

कोरोनाच्या भीतीमुळे जंगलात भरतो बाजार

त्यानंतर ग्रामस्थांकडून अचानक अनेक ठिकाणी जंगलात बाजार भरविला जात आहे. भाजीपाला व इतर जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी परिसरातील 50 ते 60 गावांतील नागरिक गर्दी करतात. जंगलात बाजार भरल्याची माहिती मिळताच भाजीविक्रेते व व्यापाऱ्यांनी पंदेवाही गावालगतच्या जंगलात, कसनसूर मार्गावर एटापल्ली टोला गावालगतच्या जंगलात, आलापल्ली मार्गावर गुरुपल्ली जंगलात, डुम्मे, मरपल्ली व वासामुंडी गाव जंगल परिसरात मिळेल त्या झाडाच्या सावलीत आपली दुकाने थाटली. याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आपला मोर्चा ठिकठिकाणी जंगलात वसलेल्या बाजाराकडे वळविला.

एटापल्ली तालुक्‍यात 10 कोरोनाबाधित रुग्ण

गर्दीच्या ठिकाणी तसेच शहरात बाजारामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने नागरिकांनी त्यावर मार्ग काढत चक्क जंगलात बाजार भरवून परिसरातील गावातील ग्रामस्थांना भाजीपाल्यासह जीवनावश्‍यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. एटापल्ली तालुक्‍यात आजवर सर्वाधिक 10 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांकडून खबरदारी म्हणून आठवडी बाजार चक्क जंगलात भरविला जात आहे.

जाणून घ्या : अमरावती करतोय नागपूरचा पाठलाग; चार रुग्णांच्या वाढीने तिसऱ्या शतकाकडे वाटचाल


व्यापाऱ्यांनी घेतली धास्ती

प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवली जात होती. याबाबतची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने छापा टाकून अनेक दुकानादारांवर दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाईची धास्ती स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे कित्येक व्यापारी दिलेल्या वेळेपूर्वीच दुकाने बंद करीत असल्याचे दिसून येते. मात्र, भाजीविक्रेत्यांकडून संचारबंदीचे नियमाचे उल्लंघन केले जात असल्याची ओरड आहे. आठवडी बाजार भरविण्यावर बंदी असतानाही जंगलाचा आडोसा घेऊन बाजार भरविला जात आहे.

loading image