esakal | जनता कर्फ्यूतही गडचिरोलीच्या या माणसाने जपली माणुसकी
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली : वाहतूक पोलिसांना चहा देताना जितेंद्र उपाध्ये.

जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असून त्याची मृत्यूछाया गडचिरोली जिल्ह्यावरही पडली आहे. रविवारी हीच मृत्यूछाया दूर करण्यासाठी जनता कर्फ्यू पाळला जात असताना चायनीज ठेला चालविणारे जितेंद्र उपाध्ये जिवावर उदार होऊन या कर्फ्यूतही कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, डॉक्‍टर्स, परिचारिकांसाठी पाणी, चहा, बिस्किटांचे वाटप करीत होते.

जनता कर्फ्यूतही गडचिरोलीच्या या माणसाने जपली माणुसकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. कोरोना आजाराच्या मुसक्‍या आवळण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती सहकार्याच्या भूमिकेत उभा असलेला दिसत आहे. त्यासाठी रविवार (ता. 22) "जनता कर्फ्यू' पाळण्यात आला. या कर्फ्यूला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

संसर्गाची मानवीय साखळी तोडण्यासाठी जनतेने जनतेसाठी लादलेल्या कर्फ्युत प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली. रविवारी सर्वच दुकाने, विक्री केंद्रे बंद होती. प्रत्येकाने घरातच राहणे पसंत केले. व्यापारी आणि छोट्या मोठ्या दुकानदारांनीसुद्धा आपल्या घरीच थांबून मोठे योगदान दिले. मात्र, डॉक्‍टर्स, पोलिस जवान आपल्या कर्तव्यावर तैनात होते. कर्तव्यावर असलेल्या अशा अनेक कर्मचाऱ्यांना पाण्याविना राहावे लागले.

पोलिस, डॉक्‍टरांना पाणी, चहा, बिस्कीट दिले

गडचिरोली येथील जितेंद्र उपाध्ये यांनी घराबाहेर पडण्याचा विचार केला. जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी झटणारे पोलिस, डॉक्‍टर्स यांच्या खाण्यापिण्याची कोणतीच सोय नव्हती. त्यामुळे आपण त्यांची मदत केली पाहिजे, असा ठाम निर्धार त्यांनी केला. ते स्वयंस्फूर्तीने शहरातील चौकाचौकात फिरले. तेथे तैनात असलेल्या पोलिस जवानांना तसेच रुग्णालयात कार्यरत डॉक्‍टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांना पाणी, चहा, बिस्कीट दिले. दिवसभर तणावात असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्यासाठी कुणीतरी काळजी करते, या एका विचारानेच स्मितहास्य आले. येथील गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर छोटासा चायनीज ठेला चालविणाऱ्या जितेंद्र उपाध्याय यांचे साहस, दातृत्व व समाजसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : हाच खरा कोरोना फायटर : जनता कर्फ्यूत दिली अंत्यसंस्कारासाठी सेवा

अंधानुकरण नको

जितेंद्र उपाध्ये यांनी जनता कर्फ्यूदरम्यान कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत केली असली; तरी सर्वांनी लगेच तोच कित्ता गिरवत अंधानुकरण करीत मदतकार्य करायची गरज नाही. सध्या पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंधने आहेत. ते नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्‍यक आहे.

म्हणून सामाजिक कार्याची आवड असलेल्या व्यक्तींनी सरकारच्या सूचनांचा मान ठेवून सर्व प्रकारची सावधगिरी बाळगूनच कार्य करावे. सध्यातरी घरात राहणे, स्वत:ची परिवाराची काळजी घेणे, आपल्याला कुणापासून व आपल्यापासून कुणाला संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे, हीच सध्याची सर्वांत मोठी देशसेवा व समाजसेवा आहे.