गडचिरोली : गणेशमूर्ती घडविताना देवदत्त शंकरपुरे.
गडचिरोली : गणेशमूर्ती घडविताना देवदत्त शंकरपुरे.

गडचिरोलीच्या इवल्याशा देवदत्तची मूर्तीकला पाहिलीत का? मातीत रमून घडविले ‘देवबाप्पा’...वाचा तर मग सविस्तर

गडचिरोली : तो उण्यापुऱ्या आठ वर्षांचा. चौथ्या वर्गात शिकणारा गोड, गोंडस मुलगा. पण, त्याने ठरवलं आपण देवबाप्पाच घडवायचा. मग, काय? त्याचे मऊशार हात तशाच मऊशार मातीत रमू लागले आणि त्याला मूर्तीकलेचे कौशल्यही जमू लागले. मग, छोटुकल्या देवदत्तने ‘देवबाप्पा' अर्थात श्रीगणेशाची छानशी मूर्तीच घडवली. तिला रंगरूप देऊन सुबकताही जपली.

गडचिरोलीतील या छोट्याशा बालकाचे नाव आहे देवदत्त शशिकांत शंकरपुरे. तो आता चौथ्या वर्गात गेला आहे. कोविड-१९ मुळे लॉकडाउनच्या काळात त्याची ऑनलाइन शाळा सुरू असली; तरी इतर वेळ तो रिकामाच असायचा. एके दिवशी त्याने तुळशीच्या कुंडीतील काही माती घेऊन कुणालाच न सांगता गणपती बाप्पाची छोटी मूर्ती साकारली. त्यानंतर मूषक (उंदीरमामा) महाराजदेखील बनविले. त्याने त्या मूर्तींना स्वत:च रंगदेखील दिला. त्यानंतर मुषकासह गणेशमूर्ती देव्हाऱ्यात ठेवून पूजा करण्याचा हट्टही धरला.

नागपंचमीला बनविले नागोबा

पुढे नागपंचमीच्या सणाला त्याने आईला मातीचा नागोबा बनवून दिला. देवदत्तचे वडील शशिकांत शंकरपुरे मानसशास्त्रज्ञ असल्याने त्यांनी त्याच्या बालमनाचा हट्ट जाणून घेत त्याला योग्यप्रकारे प्रोत्साहनही दिले. आई डॉ. तृप्ती शंकरपुरे या बीएमएमची पदवी प्राप्त आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांनीही मातीचे उपयोग आणि महत्त्व याच माध्यमातून त्याला समाजावून सांगितले.

त्याच्या बालहट्टाला सलाम

देवदत्तचा छंद वाढतच गेला. बैल पोळ्याला त्याने बाजारातील लाकडी बैलांचा हट्ट न धरता घरीच मातीचे दोन बैल बनविले आणि पूजेमध्येसुद्धा ठेवले. त्याच दरम्यान त्याच्या शाळेतील कला शिक्षक अनिल निकोडे यांच्या व्हॉटसॲपवर त्याला त्यांचे मातीचे बैल बनवतानाचे छायाचित्र दिसले. मग, देवदत्तने आपल्याला तशीच माती हवी म्हणून हट्ट धरला. त्याच्या बालहट्टाचा मान ठेवत त्याच्या आईबाबांनी शिक्षक निकोडे यांच्याशी संपर्क साधून मूर्तीसाठी मातीची विचारणा केली. आपला विद्यार्थी मातीत रमतोय हे ऐकल्यावर त्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी तशी माती उपलब्ध करून दिली. मग तीच माती वापरून त्याने गणेशोत्सवासाठी छानशी मूर्ती तयार केली.

मातीशी मैत्री महत्त्वाचीच

अलीकडे पालक मुलांच्या स्वच्छतेबद्दल गरजेपेक्षा अधिक जागरूक असतात. त्यामुळे मुलांना धूळमातीपासून दूरच ठेवण्यात येते. बॅक्‍टेरिया, व्हायरसच्या नावाने मुलांना घाबरवत त्यांची मातीशी मैत्रीच होऊ दिली जात नाही. यापूर्वीच्या पिढीतील बालके धूळमातीत दंगा करायची; तरी त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगलीच असायची. त्यामुळे बालकांची मातीशी मैत्री महत्त्वाची आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com