
अमरावती : कोरोनाने दररोजचेच व्यवहार थांबले आहेत. चार महिने होऊनही परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. कोरोनाचे सावट आगामी सण-उत्सवांवरही राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषत: गणेशोत्सव हा तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेऊन सुरू केलेल्या या गणेशोत्सवाला यंदा कोरोना संकटात नवीन आयाम देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान अमरावतीच्या महापौरांनी केले असून त्यानिमित्ताने या उत्सवाला जनजागृतीचा नवा आयाम जोडला आहे.
सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असून अमरावतीची रुग्णसंख्या दीड हजारापर्यंत पोहोचली आहे. अशात आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या संकटात दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा न करता आरोग्यउत्सव साजरा करू या, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे.
गणेशोत्सवासंबंधी महाराष्ट्र शासनाने दिशानिर्देश जारी केले आहेत. सध्याची स्थिती पाहता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावा. आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम घेण्यात यावेत, राज्य शासनाच्या दिशानिर्देश व आवाहनाप्रमाणेच शहरातील कोणतीही गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. उत्सव साजरा करताना गर्दी करू नये. सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, सर्वांनी मास्क लावावे, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा, विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा यंदाचा उत्सव आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करताना विशेष काळजी घेऊनच साजरा करायचा आहे. कुठेही नागरिकांची गर्दी होणार नाही याचीही विशेष दक्षता घ्यावी, गणेशमूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावातच करायचे आहे, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महापालिका, पोलिस यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहणार आहे.
महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे. यावर्षी शक्यतोवर पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी करावे.
श्रींचे दर्शन ऑनलाइन
श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशसुद्धा महापौरांनी दिले आहेत.
मिरवणुका नकोत
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.