esakal | नागपुरात शाळकरी मुलीवर स्मशानभूमीत नेऊन 'गँग रेप' 
sakal

बोलून बातमी शोधा

crime

हिंगणा पोलिसांचा नकार 
या घटनेविषयी हिंगणा पोलिसांनी बरीच गुप्तता बाळगली. सोमवारी रात्री हिंगण्याच्या महिला पो. नि. (गुन्हे) क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता अशी कुठलीही घटना आमच्याकडे घडली नसल्याचे सांगून या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की, हिंगणा पोलिसांनी सोमवारी रात्री 9 वाजता हा गुन्हा दाखल केला.

नागपुरात शाळकरी मुलीवर स्मशानभूमीत नेऊन 'गँग रेप' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रात्रीच्या वेळी शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून स्मशानभूमीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी एका आरोपीला अटक करून एका विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे. 

पीडित मुलगी ही शाळकरी मुलगी आहे. तिचे आईवडिल शेतमजूर आहेत. 8 सप्टेंबरच्या रात्री 10.30 च्या सुमारास पीडित मुलगी ही एकटीच शौचास गेली होती. शौच आटोपून ती घरी येत असताना रस्त्यातच आरोपी अमीत जयप्रकाश ठाकूर (18), बलवंत गौड (20) आणि दोन विधी संघर्षग्रस्त मुलांनी तिला गाठले. चौघांनीही जबरीने तिला दुचाकीवर बसवून गावाजवळच असलेल्या स्मशानभूमीत नेले. त्यानंतर चौघांनीही तिच्यावर सामहिक बलात्कार केला. त्याचप्रमाणे तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिची सुटका केली. त्याचप्रमाणे ही घटना कुणालाही सांगितल्यास तिला पाहून घेण्याची धमकी दिली. 

इकडे बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. परंतु, ती कुठेही मिळून आली नाही. गावातच राहणाऱ्या नातेवाईकांकडे ती गेली असेल असे तिच्या आईवडिलांना वाटले. 

इकडे नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर मुलगी आपल्या घरी न जाता गावातच राहणाऱ्या मावशीच्या घरी गेली आणि मावशीला हा प्रकार सांगितला. रात्र बरीच झाल्याने त्या रात्री पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. सोमवारी सकाळी मुलगी हिंगणा पोलिस ठाण्यात गेली आणि घटनेची माहिती दिली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी बलात्कार, पोक्‍सो आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपी अमीत ठाकूर यास अटक करून एका विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी गावातून पळून गेल्याची माहिती आहे. 

हिंगणा पोलिसांचा नकार 
या घटनेविषयी हिंगणा पोलिसांनी बरीच गुप्तता बाळगली. सोमवारी रात्री हिंगण्याच्या महिला पो. नि. (गुन्हे) क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता अशी कुठलीही घटना आमच्याकडे घडली नसल्याचे सांगून या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की, हिंगणा पोलिसांनी सोमवारी रात्री 9 वाजता हा गुन्हा दाखल केला. माहिती कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री 10 च्या सुमारास हिंगणा पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अरविंद नावाच्या हवालदाराने अजून गुन्हा दाखल व्हायचा आहे असे सांगून फोन ठेवला. या एकंदरीत प्रकारावरून हिंगणा पोलिस घटनेविषयी किती गंभीर आहेत हे लक्षात येत आहे. ठाणेदारासारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने आमच्याकडे असा गुन्हा घडला नसल्याचे सांगून आरोपींना पाठीशी घालण्याचा तर प्रयत्न करीत ना असा संशय निर्माण झाला आहे.

loading image