यहॉं के हम सिकंदर...

gang war in nagpur
gang war in nagpur

नागपूर : टोळीयुद्ध आणि त्यातून प्राणघातक हल्ले हा प्रकार उपराजधानी नागपुरला नवीन नाही. गुंडगर्दी करीत वस्तीतून टोळीने हिंडणे, दहशत निर्माण करणे आणि उदरनिर्वाहासाठी दिवसभर घाम गाळणाऱ्या फेरीवाल्यांकडून, किरकोळ दुकानदारांकडून हप्ते वसूल करणे, हाच या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा पोटापाण्याचा व्यवसाय असतो. यहॉं के हम सिकंदर या थाटात वावरणाऱ्या या गल्ली गुंडांना कायदा आणि पोलीसांचेही भय वाटत नाही. यातूनच मग त्यांची आपापसात भांडणे होतात आणि वर्चस्वावरून अनेकदा खूनही पडतात. अशीच घटना नागपुरातील गड्डीगोदाम भागात नुकतीच घडली.
गड्डीगोदाम येथे बुधवारी हप्तावसुली करणाऱ्या गुंडांनी अन्य वस्तीत रंगदारी करणाऱ्या एका युवकावर तलवारीने हल्ला केला. यात युवक गंभीर जखमी झाला. उमेश पाटील (28, रा. कडबी चौक, नागपूर) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून उमेश पाटील गड्डीगोदाम परिसरात फिरत होता. उमेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हा प्रकार आरोपी सुरेंद्र उकेच्या लक्षात आला. बुधवारी दुपारच्या सुमारास उमेश गड्डीगोदामच्या मैदानावर क्रिकेट पाहत बसला होता. त्यावेळी आरोपी सुरेंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने उमेशला "आजकल इधर जादा घूम रहे हो. इधर चंदू अपना भाई हैं' असे म्हटले. त्यावर उमेशने त्याला "मैं किसी चंदू को नहीं जानता' असे म्हटले. त्यानंतर तेथून निघून गेलेल्या सुरेंद्रने हा प्रकार आरोपी चंदू मस्के आणि आरोपी अजय राऊतला सांगितला. काही वेळानंतर चंदू हातात तलवार घेऊन मैदानावर आला. चंदू तलवार घेऊन येत असल्याचे पाहून उमेश घाबरला आणि जीव मुठीत घेऊन पळू लागला. यावेळी चंदूने त्याच्या दिशेने तलवार भिरकावली आणि आरोपी सुरेंद्र आणि अजयने त्याच्या दिशेने दगड आणि विटा भिरकावल्या. उमेश या हल्ल्यात जखमी झाला. घटनेनंतर तिन्ही आरोपी पळून गेले. जखमी उमेशने सदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

आरोपी जामीनावर बाहेर

उल्लेखनीय म्हणजे आरोपी चंदू मस्के एका खुनाच्या घटनेत नागपूर कारागृहातून जामीनावर काही दिवसांपूर्वीच बाहेर आला आहे. त्यानंतर त्याने आरोपी अजय राऊतच्या मदतीने हप्तावसुलीचा धंदा पुन्हा सुरू केल्याचे बोलले जाते. आरोपी अजय राऊतवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com