esakal | मध्य प्रदेशातील गांजा तस्कराला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मध्य प्रदेशातील गांजा तस्कराला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कारमधून गांजाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गांजा तस्कराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून चार लाखांचा गांजा आणि कार असा 10 लाख 8,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बाळकृष्ण नानकचंद जैन (40, रा. त्रिमूर्तीनगर, जबलपूर-मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण जैन याला यापूर्वी गांजा तस्करीत पोलिसांनी दोन-तीनदा पकडले होते. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहाबाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा तस्करी सुरू केली. चार दिवसांपूर्वी त्याने आणि अवधेश अज्जू विश्वकर्मा (30) ब्रिजगळा चौकीजवळ, जबलपूर यांनी ओरिसा येथून 2 हजार रुपये प्रतिकिलोने 40 किलो गांजा खरेदी केला. एमपी 20 सीएफ 1088 क्रमांकाच्या टाटा जेस्टा कारमध्ये गांजाचे पुडे भरून तो नागपूरमार्गे जबलपूरला जात होता. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांना मिळाली. त्यांनी शनिवारी दुपारी 4.25 च्या सुमारास कळमना हद्दीतील जबलपूर-हैदराबाद मार्गावर सापळा रचला. कापसी पुलावरून चुकीच्या मार्गाने येत असताना पोलिसांनी कारला थांबविण्याचा इशारा दिला. तोच गाडी थांबवून अवधेश पळून गेला. बाळकृष्णने कापसी पुलावरून खाली उडी घेतली. त्यामुळे तो जखमी झाला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात सहा पाकिटांमध्ये 40 किलो 44 ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी कार आणि गांजासह 10 लाख 8440 हजारांचा माल जप्त केला. या प्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून बाळकृष्णला अटक केली. ही कारवाई पोलिस कर्मचारी सचिन शेलोकर, राहुल गुमगावकर, कामठी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या पथकाने केली.

loading image
go to top