esakal | ढोलताशांच्या गजरात घरोघरी बाप्पांचे आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

ढोलताशांच्या गजरात घरोघरी बाप्पांचे आगमन

ढोलताशांच्या गजरात घरोघरी बाप्पांचे आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या गणरायाचे आज घराघरांत मंगलमय वातावरणात आगमन झाले. बापाच्या आगमनासाठी आसुसलेल्या नागपूरकरांनी गणपती मूर्तीची स्थापना करताच उत्साह घराघरात उत्साह ओसांडून वाहू लागला. फुलांचा वर्षाव करीत भाविक दुकानांपासून ते घरापर्यंत 'बाप्पा मोरया'चा जप करतच परतले. विविध गणेश मंडळांनी दुकानांपासून ढोल-ताशांच्या गजरात आपआपल्या परिसरापर्यंत मिरवणूकच काढली. सकाळपासून दुपारपर्यंत पावसानेही हजेरी लावली, मात्र गणराज रंगी रंगलेल्या भाविकांनी उत्साह कायम ठेवत भक्तीरसात चिंब होण्याचा आनंद लुटला.
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरकरांनी स्वागताची जोरदार तयार केली. आज सकाळपासूनच घराघरांत गणरायांच्या मंगलगीतांनी संपूर्ण शहर भक्तीमय केले. गणरायाला घरी आणण्यासाठी चिमुकल्यांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांमध्येच उत्साह संचारला. सकाळी पावसानेही हजेरी लावून गणरायाचे स्वागत केले. पाऊस सुरू असतानाही चिआरओळ, सक्करदरा, इतवारी, धरमपेठ, गोकुळपेठ, सदर, इंदोरा, प्रतापनगर, म्हाळगीनगर, दीघोरी, मानेवाडा, नंदनवन, पारडी, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, गड्डीगोदाम आदी भागातील बाजारांमध्ये नागरिकांनी मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली. आधीच खरेदी करून ठेवलेली गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी चारचाकी, दुचाकीसह नागरिक मुख्य बाजार असलेल्या चितारओळीत पोहोचले. दुपारपर्यंत मोठ्या गणेश मंडळाचे उत्साही कार्यकर्तेही ढोल, ताशा, संदल पथकासह आले. त्यामुळे महालमध्ये जणू जत्राच भरली. गणरायांची मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. शहराच्या इतर बाजारांमध्येही अशीच स्थिती दिसून आली. बाजाराप्रमाणेच शहरातील सर्वच रस्ते आज गणेशभक्तींनी फुलले होते. कुणी गणरायाच्या मूर्तीसाठी, कुणी मखर आदी सजावटीच्या साहित्यासाठी, कुणी फुलांसाठी तर कुणी पुजेच्या साहित्यासाठी धावपळ करताना दिसून आले. दुपारनंतर पावसाने उसंत देताच बाजारातील गर्दीत आणखी भर पडली. त्यामुळे सायंकाळपर्यंत गणरायाचे प्रत्येकाच्याच घरात आगमन झाले.
काहींनी काल, रविवारी सुटी असल्याने बाप्पांसाठी संपूर्ण घर शोभिवंत कृत्रिम फुले, पाने, विद्युत दिव्यांनी सजविले. त्यामुळे आज गणरायाची मूर्ती आणून सकाळी पूजाविधी करीत प्रतिष्ठापना केली. सायंकाळपर्यंत सर्वच घरांत मंगलमय वातावारणात आरती, मंत्रपुष्पांजलीने शहराचे वातावरण धार्मिक झाले. मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनीही गणरायाच्या मूर्तीपुढे नृत्य करीत रस्त्यांवरील नागरिकांचे लक्ष वेधले. ढोल-ताशा, संदल, डीजेच्या तालावर थिरकत 'गणपती बाप्पा मोरया' अशा घोषणा देत तरुणांनीही शहरातील उत्साहात भर घातली.
loading image
go to top