(Video)बैलाच्या जागी मुलाला जुंपल्याने द्रवली संवेदनशील मने, आणि मिळाली ही लाखमोलाची मदत

संतोष अवसरमोल  
Tuesday, 15 September 2020

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यांतर्गत येणाऱ्या घाटबोरी या लहानशा खेड्यातील शांताबाई श्यामराव सोनुने यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मुलगा विजय सोनुने तीन-चार महिन्यांचा असतानाच वडिलांचे छत्र हरविले. श्यामराव शिवराम सोनुने यांचे निधन झाले. शांता सोनुने या विधवा महिलेने परिस्थितीवर मात करीत तीन मुलीचे लग्न व मुलाचे लग्न केले.

घाटबोरी (जि. अमरावती) : वर्षानुवर्षे शेतात राबून उद्याच्या सोनेरी स्वप्नांची पहाट उजाडत त्यांच्या आयुष्यातील एक एक दिवस मागे सरत होता. शेतात मेहनत घ्यायची तयारी, मात्र शेतीकामासाठी बैलजोडीच नाही, उसनवारीवर गावात कुणी कितीदा मदत करणार?, कुणाकडे किती मागणी करायची? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आणि मायलेकांनीच स्वतः बैलजोडी होऊन अख्खे शेतशिवार नांगरून काढण्यास सुरुवात केली. अनेक महिन्यांपासून स्वतःच बैलांचे काम करीत शेतात काबाडकष्ट करणाऱ्या घाटबोरी येथील मायलेकांच्या परिश्रमाला अखेर अश्रूंचे बांध फुटले आणि अमरावतीमधील देवदूत त्यांच्या मदतीला धावले. याच देवाने पाठविलेल्या देवदूतांच्या मदतीने शांताबाई सोनुने व त्यांच्या मुलाला हक्काची बैलजोडी मिळाली आणि श्रमाचे चीज झाले.

बनावट कागदपत्रांव्दारे स्थापन केली बोगस फर्म, सख्ख्या भावंडांकडून फसवणूक https://www.esakal.com/vidarbha/firm-set-fictitious-

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यांतर्गत येणाऱ्या घाटबोरी या लहानशा खेड्यातील शांताबाई श्यामराव सोनुने यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मुलगा विजय सोनुने तीन-चार महिन्यांचा असतानाच वडिलांचे छत्र हरविले. श्यामराव शिवराम सोनुने यांचे निधन झाले. शांता सोनुने या विधवा महिलेने परिस्थितीवर मात करीत तीन मुलीचे लग्न व मुलाचे लग्न केले. घरी ई-क्लासची भाडेपट्टी झालेली तीन एकर कोरडवाहू जमीन, राहण्यासाठी घर नाही, नशिबात अठराविश्वे दारिद्रय, अशा कठीण परिस्थितीत उघड्यावर असलेला संसार, पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात मेहनत करायची, दारात गाय-बैल नसल्याने स्वत:च बैलासारखी शेतात कामे करायची अन् अशातच यावर्षी दुबार पेरणीचा सामनासुद्धा त्यांनी केला. 

 

हेही वाचा - जन्मठेप म्हणजे किती वर्षांची शिक्षा? आजीवन कारावास की १४ वर्ष? वाचा सविस्तर
 

शेतात डवरणीसाठी बैल नसल्याने शांताबाई सोनुने यांनी मुलगा विजय सोनुने यांच्या खांद्यावर ’जू’ देऊन शेतातील डवरणी केली. हे सर्व वास्तव ‘सकाळ'ने मांडले. या महिलेच्या जीवनाची संघर्षमय कथा जनतेसमोर मांडण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर हे वास्तव पोहोचले. ‘सकाळ'च्या या वृत्ताची दखल घेत अमरावतीच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शरद देशमुख यांनी या महिलेला बैलजोडी देण्याचा संकल्प केला. त्यानुसार मंगळवारी (ता. १५) संकल्पपूर्ती करण्यात आली. जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व अमरावतीच्या गोरक्षण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. बी. अटल यांच्या उपस्थितीत त्या माउलीला बैलजोडी देण्यात आली. 

यावेळी डॉ. शरद देशमुख यांनी माउलीला लुगडे व मुलाला कपडे तसेच बैलाच्या वेसणपासून तर सर्व साहित्यसुद्धा भेट केले. अंबादेवी मंदिराच्या जवळ असलेल्या गोरक्षणात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात गोरक्षण संस्थेचे सचिव दीपक मंत्री, प्रा. संजय तीरथकर, मनोहर मालपाणी, कमल सोनी, गोपाल बियाणी, प्रमोद चांडक, विनोद चौधरी, श्री. ककरानिया आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कौटुंबिक सोहळा पार पडला.

 
क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत
 

‘सकाळ’ने फोडली वाचा

एका मातेला डवरणीसाठी बैलाच्या जागेवर मुलाला जुंपावे लेगल्याचे वास्तव ‘सकाळ’ने उजेडात आणले. ही बातमी वाचताच अमरावतीच्या डॉ. शरद देशमुख यांच्या जिवाची तगमग सुरू झाली. त्या माउलीला मदत करण्यासाठी त्यांच्या डोक्यात विचाराची चक्रे फिरू लागली व त्यांनी अमरावतीच्या सकाळ कार्यालयाशी संपर्क साधून त्या माउलीला बैलजोडी देण्याचा संकल्प बोलून दाखविला. यासोबतच त्यांनी गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अटल यांच्याशी संपर्क साधून हे पवित्र कार्य आज पार पाडले. 

 
 शेतकरी कुटुंबाला लाखमोलाची मदत
केवळ बोलण्याने काही साध्य होत नाही तर आपण जो विचार करतो तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याला कृतिशीलतेची जोड हवी असते. सकाळ माध्यम समूहाने हीच सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. त्याच माध्यमातून आज एका शेतकरी कुटुंबाला लाखमोलाची मदत झाली, ही आपल्यासाठी धन्यतेची बाब आहे.
-पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्रधान सचिव, हव्याप्र मंडळ, अमरावती. 

खऱ्या अर्थाने आधार
एका शेतकरी कुटुंबाला बैलजोडी देताना विलक्षण आनंद होत आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून मदत देण्यात आली आहे. घाटबोरी येथील शेतकरी कुटुंबाला खऱ्या अर्थाने आता आधार मिळाल्याचा आनंद आहे.
-अ‍ॅड. आर. बी. अटल,  अध्यक्ष, गोरक्षण संस्था.

गोरक्षण संस्था, सकाळचा वाटा
शेतात कष्ट करण्याची तयारी असलेल्या एका कष्टाळू शेतकरी कुटुंबाची व्यथा जाणून त्यांना मदत देण्याचा संकल्प महत्त्वाचा ठरला. गोरक्षण संस्था, सकाळ माध्यम समूहाने यात मोलाचा वाटा उचलला. आज एका शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद व  समाधान कधीही विसरू शकणार नाही.
-डॉ. शरद देशमुख, अमरावती. 
 

तुम्हीच आमचे मायबाप

बैलजोडी मिळाल्याचा आनंद आहेच, मात्र त्यापेक्षाही आनंद आमच्या वेदना समजून घेतल्या याचा अत्याधिक आहे. आजच्या जगात अशी कृतीसुद्धा माणूस करू शकतो, यावर आमचा विश्वासच बसत नाही. तुम्हीच आमचे मायबाप बनून आम्हाला मदतीचा हात दिला असल्याचे शेतकरी शांताबाई सोनुने यांनी सांगितले.  

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghatbori's widow women gets pair of bulls