जो खाईल तूप त्याला येईल रूप... वाचा तूप खाण्याचे फायदे 

राजेंद्र मारोटकर
Saturday, 8 August 2020

पूर्वीच्या काळी खेडोपाडीच नव्हे तर शहरांमधून सुद्धा लोणी विकायला येत होते. याचे कारण खेड्यांमध्ये बहुतेक जणांकडे शेती असल्याने त्यांच्याकडे गायी-म्हशी हमखास पाळल्या जात होत्या.

नागपूर ः जो खाईल तूप त्याला येईल रूप, अशी एक म्हण पूर्वी प्रचलित होती. त्याचे कारणही तसेच आहे. पूर्वीचे लोकं रोजच्या जेवणात तुपाचा भरपूर वापर करायचे. त्याचमुळे त्याचे आरोग्यसुद्धा अतिशय चांगले राहायचे. ते धष्टपुष्ट दिसायचे. रोजच्या  जेवणात  तूप वापरण्याचे अनेक फायदे आहेत. 

पूर्वीच्या काळी खेडोपाडीच नव्हे तर शहरांमधून सुद्धा लोणी विकायला येत होते. याचे कारण खेड्यांमध्ये बहुतेक जणांकडे शेती असल्याने त्यांच्याकडे गायी-म्हशी हमखास पाळल्या जात होत्या. त्यामुळे घरोघरी दूधदुभत्यांची रेलचेल रहायची. आवश्यक तेवढे दूध घरी ठेवून इतर दुधाचे दही लावले जात होते. त्या दह्यापासून लोणी तयार केले जात होते. नंतर घरातील बाया-बापडे हेच लोणी बाजारात विकायला आणायचे. त्या काळी दुधाचे उत्पादन भरपूर होत असल्याने तुपाला भावसुद्धा कमी होता. त्यामुळे पूर्वीचे लोक आपल्या जेवणात हमखास तुपाचा वापर करायचे. त्याचमुळे पूर्वीच्या लोकांची शरीर प्रकृती आताच्या लोकांच्या तुलनेत दांडगी होती. 

पूर्वीच्या तुलनेत आताच्या माणसांचे जीवन ऐशोआरामाचे झाले आहे. परिणामी लठ्ठपणासारखे इतर आजार त्याला जडले. त्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आज अनेकजण तुप खाणे टाळतात. परंतु हा एकप्रकारेचा गैरसमज आहे. शुद्ध तुप खाण्याचे अनेक फायदे आहेत. तूप खाल्ल्याने शरीरातील उष्मांक वाढतो. त्यामुळे डॉक्टर आजारी व्यक्तींना जेवणात तूप खायला सांगतात. बाळंतपणात महिलांना शुद्ध तुपाचा शिरा करून खायला देतात. त्याचे कारण हेच की, तुपामुळे शरीरात ताकद निर्माण होते. शुद्ध तुप खाण्याचे अनेक फायदे आहेत. तूप खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. म्हणूनच पूर्वीचे लोक आताच्या लोकांच्या तुलनेत अधिक अंगमेहनतीची कामे करायचे. तसेच दररोज जेवणात तुपाचा वापर केल्यास वात आणि पित्ताचा त्रास होत नाही. जेवणात तूप खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा चांगली राहते. 

अवश्य वाचा- विदर्भात कोरोनाने वाढविली धाकधूक; दोनशेवर रुग्णांचा मृत्यू

तूप खाण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत. ते म्हणजे, दररोज तूप खाल्ल्याने डोळ्यांवर पडणारा ताण कमी होतो. म्हणूनच आपण पाहिले असेल की, जुन्या लोकांना खूप कमी प्रमाणात चष्मा लागायचा. अगदी म्हातारपणातसुद्धा त्यांचे डोळे चांगले असायचे. आतातर लहानपणापासूनच मुलांना चष्मा लागतो. आजकाल तैलीय पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याने, तसेच धावपळीच्या जीवनामुळे हृदयरोगाचे प्रमाण, हृदयाच्या नलिकांमध्ये अवरोध, म्हणजेच ब्लॉकेजेस निर्माण होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे जेवणात तूप खाल्ल्यास ते लुब्रिकेंटचे काम करून रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यास मदत करते. 

अवश्य वाचा- पहिले मुलं, नंतर खासदार आता आमदार; राणा कुटुंबीयच कोरोनाबाधित

तूप खाल्ल्याने गॅसेस तसेच पित्ताचे प्रमाण कमी होते. शुद्ध तुपामुळे त्वचा मऊ राहते. त्यामुळे तुपाची चेहऱ्यावर मसाज करणे फायदेशीर ठरते. तुपामध्ये तेलापेक्षा पोषक तत्त्वे अधिक असतात. लोण्यापेक्षा तुपाचे सेवन करणे अधिक चांगले असते. आजकाल बाजारात मिळणाऱ्या तुपामध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरीच दूधापासून तूप तयार करणे अधिक चांगले आहे. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghee is very important for heath