सिरोंचात राहत होते महाकाय डायनॉसोर 

Dinasor
Dinasor

गडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला गडचिरोली जिल्हा जसा जंगल, वन्यजीव, खनिजांसाठी प्रसिद्ध आहे, तसाच अतिप्राचीन जीवाश्‍मांसाठीही प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्‍यात डायनॉसोरचा पूर्ण सांगाडा यापूर्वीच मिळाला असून वृक्ष, वनस्पती, जलजिवांचे अनेक जीवाश्‍म मिळाले आहेत. कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या ज्युरासिक काळाची साक्ष देणाऱ्या या जीवाश्‍म भूमीचे जतन, संवर्धन, संशोधन आवश्‍यक आहे. शिवाय पर्यटनाला चालना देणे आवश्‍यक आहे. मात्र, याकडे अद्याप फारसे लक्ष देण्यात आलेले दिसून येत नाही. 

वडदम परिसरात कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीवाश्‍म

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍यातील वडदम या परिसरात कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीवाश्‍म भूगर्भशास्त्रज्ञांना आढळले आहेत. तत्कालीन उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्‍ला यांनी यावर बरेच कार्य केले. त्यानंतरच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबत्तुला, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनीही त्या दृष्टीने बरेच प्रयत्न केले. सध्या उपवनसंरक्षक सुमितकुमार या जीवाश्‍मांचे संरक्षण व पर्यटन विकासासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

डायनॉसोरचा होता वावर 

चंद्रपूरचे भूगर्भशास्त्र तथा निसर्ग अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनीही या परिसराला भेट देत या भूमीचा अभ्यास केला. एवढेच नव्हे, तर परदेशी संशोधकांनीही येथे भेट दिली असून एकेकाळी डायनॉसोरचा वावर असलेली ही भूमी असल्याच्या दाव्यावर शिक्‍कामोर्तब केले आहे. या परिसरात वृक्ष, डायनॉसोरसारखे महाकाय प्राणी, वनस्पती, मासळीसारख्या जलजिवांचे जीवाश्‍म मिळाले आहेत.

फॉसिल पार्कची निर्मिती

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 189 किलोमीटर, तर सिरोंचा तालुक्‍यापासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडदम येथे मिळालेल्या प्राचीन जीवाश्‍मांना जतन करून वनविभागाने तेथे फॉसिल पार्कची निर्मिती केली आहे. पण, या पार्कचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नाही. येथे जीवाश्‍माची माहिती देणारे फलक नाहीत. 

आणखी सांगाडे मिळण्याची शक्‍यता 

विशेष म्हणजे 1959 मध्ये या परिसरात कोठापल्ली-पोचमपल्ली गावाजवळ गोदावरी नदीच्या खोऱ्यात संशोधकांना एका डायनॉसोरचा पूर्ण सांगाडा मिळाला होता. हा सांगाडा कोलकाता येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे. येथे डायनॉसोरची अंडी, त्यांचे इतर भाग जीवाश्‍म रूपात आहेत. आणखी संशोधन व प्रयत्न केल्यास डायनॉसोरचे आणखी सांगाडे मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नक्षलग्रस्त भागात असलेल्या सिरोंचाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण देशात डायनॉसोरचे जीवाश्‍म आढळलेल्या अवघ्या पाच स्थळांपैकी हे एक आहे. यावरूनच याचे महत्त्व लक्षात येते. 

उदरातील रहस्ये 

सिरोंचा तालुक्‍यातील वडदम व इतर परिसराच्या भूमीच्या उदरात अनेक रहस्ये दडली आहेत. तुम्हाला वाचून आश्‍चर्य वाटेल; पण कोट्यवधी वर्षांपूर्वी सिरोंचा हा समुद्राचा भाग होता, असाही काही भूगर्भशास्त्रज्ञांचा कयास आहे. या भूमीत केवळ लोहखनिज, लाइमस्टोन व इतर मौल्यवान खनिजेच दडली नसून मानव व जीवसृष्टीचा इतिहासही दडला आहे. त्याचा मागोवा घेतल्यास अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होईल. जीवाश्‍माशी संबंधित पेलिओलॉजी, पेलिओबॉटनी शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संशोधनाचे समृद्ध दालन आहे. 


सिरोंचा तालुक्‍यातील वडदम व परिसरात कोट्यवधी वर्षांपूर्वीची डायनॉसोर व इतर जिवांची जीवाश्‍मे आढळली आहेत. याशिवाय येथे जलचर व वृक्ष- वनस्पतींचीही जीवाश्‍मे आढळली आहे. पण, अद्याप अनेक रहस्ये उलगडायची आहेत. त्यासाठी जिऑलॉजिकल विभागाने संशोधन करायला हवे. 
-प्रा. सुरेश चोपणे, भूगर्भशास्त्र अभ्यासक तथा संस्थापक, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com