गिरिराज सिंह म्हणतात, पशुधन विकास, शेती व्यवसाय एकमेकांना पूरक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

एनडीडीबीने विदर्भातील शेतकऱ्यांकडून दूध संकलनामध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले असून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये दूध संकलनाची रक्कम थेट पोहोचत असल्याचे एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी यावेळी सांगितले.

नागपूर : पशुसंवर्धन आणि शेती व्यवसाय हे एकमेकांना पूरक असून दुधाळ जनावरांइतकेच भाकड जनावरेसुद्धा उपयुक्त आहेत. त्याचे शेण व मलमूत्राचा वापर शेतकऱ्यांनी रासायनिक खत म्हणून केल्यास शेतीवरील रासायनिक खतांचा भार कमी होईल व कृषी उत्पादनातसुद्धा वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी आज केले. 

नागपूरमध्ये अकराव्या ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनानिमित्त कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित "विदर्भात दुग्ध उत्पादनाचा विकास व दुग्ध प्रक्रियेतील संधी' या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचे (एनडीडीबी) अध्यक्ष दिलीप रथ, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 

एनडीडीबीने विदर्भातील शेतकऱ्यांकडून दूध संकलनामध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले असून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये दूध संकलनाची रक्कम थेट पोहोचत असल्याचे एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी यावेळी सांगितले. मार्च महिन्यापर्यंत दूध संकलनासाठी तीन हजार गावांमध्ये दहा हजार शेतकऱ्यांना जोडणार असून दूध संकलनाचे लक्ष साडेतीन लाख लिटर प्रति दिवस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीडीबीमार्फत प्रगतिशील शेतकऱ्यांच्या "मायक्रो ट्रेनिंग सेंट'ची स्थापना करण्याचा निर्णय झाला असून या सेंटर्समार्फत चारा उत्पादन, पशुपालन यासंदर्भातील शास्त्रशुद्ध ज्ञान शेतकऱ्यांना देण्यात येईल.

असे सहा सेंटर तीन जिल्ह्यात स्थापन करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. हायब्रीड नेपियर, मोरिंगा, मका या चारासदृश पशुखाद्याच्या वापरासाठी शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला राज्यातील विविध भागांतून आलेले पशुपालक व दुग्ध व्यवसायातील संस्था, राज्य व केंद्र शासनाच्या दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागात विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

वर्षभर रोजगार शक्‍य 
केवळ शेती आधारित व्यवसायामुळे एखाद्याला वर्षात शंभर दिवस रोजगार मिळत असेल तर तोच रोजगार पशुपालन व्यवसायामुळे वर्षभर शक्‍यता असते, असे गिरिराज सिंह यांनी पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले. कुक्कुट पालन, बकरी पालन यातून होणाऱ्या मल व विष्ठेचे कंपोस्ट करून त्याच्या सेंद्रिय खताची निर्मिती करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीने कृषी संशोधन तसेच पशुसंवर्धन विकास यासंदर्भातील शिक्षण अभ्यासक्रमाकडे वळावे अशी अपेक्षाही गिरिराज सिंह यावेळी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Giriraj Singh, Livestock development, agricultural businesses complement each other