प्रेमासाठी युवतीने लावली अनोखी शक्कल; अपहरणाचा बनाव करून थाटला संसार

टीम ई सकाळ 
Thursday, 25 February 2021

युवतीने आपले अपहरण झाल्याचे व आपल्याला बांधून ठेवल्याचे फोटो घरच्या मंडळींना पाठविले.

अचलपूर (जि. अमरावती) : दर्यापूर तालुक्‍यातील एका गावातील २२ वर्षीय युवतीने आपले अपहरण करण्यात आल्याचा खोटा बनाव करून प्रियकरासोबत संसार थाटल्याची घटना समोर आली आहे.

सदर युवती आपल्या बहिणीकडे गेली होती. त्याचवेळी तिची ओळख अकोट तालुक्‍यातील एका युवकासोबत झाली. दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. इकडे नातेवाइकाने शेगाव पोलिस ठाण्यात युवती हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर शेगाव व अकोट पोलिस पथक शोधकार्यात लागले. दुसरीकडे सदर युवतीने आपले अपहरण झाल्याचे व आपल्याला बांधून ठेवल्याचे फोटो घरच्या मंडळींना पाठविले.

दरम्यान, प्रियकराने त्याच्या वहिनीच्या मदतीने प्रेयसीसोबत लग्न केले व वाघडोह गावात आश्रय घेतला. बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यातील संबंधित पोलिसांनी अखेर छडा लावत पथ्रोट पोलिसांच्या मदतीने प्रेमीयुगुलाला ताब्यात घेऊन शेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी शेगाव पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल साहेबराव सोनोने, जयंत बोचे, महिला पो.कॉ. रीना इंगळे, हेमांद्री घरडे, पथ्रोट पोलिस ठाण्याचे हे. कॉ. हेमंत येरखडे, पळसपगार, सुनंदा आदींनी ठाणेदार डंबाळे यांच्या मार्गदर्शनात तपास केला.

अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

युवतीचे अपहरण झालेच नाही
हरविलेल्या युवतीचा शोध व तपास करून शेगाव येथील तपास पथकाकडे दोघांनाही सुपूर्द केले. युवतीचे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. 
- नरेंद्र डंबाळे,
पोलिस निरीक्षक पथ्रोट

कायदेशीर विवाह करून दिले प्रमाणपत्र
आम्ही वधूचे समूपदेशन करतो. कुणाचा दबाव आहे काय, याची विचारणा केली असता कुठलेही दडपण नसल्याचे वधूने प्रतिज्ञापत्र भरले. त्यानुसार कायदेशीर विवाह करून विवाह प्रमाणपत्र दिले. लग्न लावण्यापूर्वी चौकशी केली असता अपहरण झाल्याचे जाणवले नाही. 
- शरद कोसरे 
प्रधान आर्य समाज मंदिर, पथ्रोट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl got married to her boyfriend under Pathrot police station