
कझाकीस्तानात धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, वर्धा व बुलडाणा येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी गेल्या होत्या. मात्र, त्या परतू शकल्या नाहीत. त्यांना जेवणासह इतर गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे सारे जग जिथे होते तिथेच थांबले. यामध्ये सर्वात अधिक अडचण झाली ती विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींची. कॉलेज बंद पडले, मात्र घरी परतण्याचे मार्ग बंद झाले होते. खाण्यापिण्याचे हाल होत होते. मात्र भारतात पालक आणि परदेशात विद्यार्थी हतबल होते.
वैद्यकीय शिक्षणासाठी कझाकिस्तानात गेलेल्या विदर्भातील पाच विद्यार्थिनी अचानक झालेल्या लॉकडाउनमुळे तेथेच अडकल्या होत्या. सकाळने सर्वांत आधी हा विषय प्रकाशझोतात आणल्याने अखेर त्या मुली मायदेशी परतल्या असून सध्या त्यांना जयपूर येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
कझाकीस्तानात धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, वर्धा व बुलडाणा येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी गेल्या होत्या. मात्र, त्या परतू शकल्या नाहीत. त्यांना जेवणासह इतर गैरसोयींचा सामना करावा लागत होता. केंद्रीयमंत्री विदेश मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून मायदेशी आणावे, अशी मागणी या विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनी केली होती.
दरम्यान, या पाचही मुली बुधवारी (ता.17) जयपूर विमानतळावर पोहोचल्या. त्यांना जयपूर येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. यासंदर्भात "सकाळ'ने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी "सकाळ'चे आभार मानले.
कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हार्सिटीमध्ये एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनी लॉकडाउनमुळे कारागंदा शहरात अडकून पडल्या होत्या. त्यात धामणगाव येथील आदिती काळे, मंगरुळ दस्तगीर येथील किरण टेंपे, बुलडाणा येथील मंजिरी महंत व वर्धा येथील रिया कांबळे, गुंजन बोकडे या विद्यार्थिनींचा समावेश होता. या विद्यार्थिनींना सुरुवातीला त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. त्यांचा पालकांशीही संपर्क होत नसल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली होती.
सविस्तर वाचा - कोरोनाचा वार, नागपुरात पाच वस्त्या सील
या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने प्रयत्न करावेत, त्यांना एअरलिफ्ट करून परत आणावे, अशी मागणी धामणगाव येथील आदिती काळेचे वडील डॉ. राजेश काळे व पालकांनी प्रशासनाकडे केली. अखेर त्या मायदेशी परतल्या असून 14 दिवसानंतर या विद्यार्थिनी त्यांच्या घरी जाणार आहेत.