निधीच मिळाला नाही़; कसे होणार बांधकाम?

अतित डोंगरे
बुधवार, 25 डिसेंबर 2019

तिरोडा पंचायत समितीअंतर्गत घरकुलाचे काम सुरळीत सुरू असताना कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला. तेव्हा या अभियंत्याकडून चार्ज न घेता बीडीओ दिनेश हरिणखेडे यांनी अभियंत्यांना कार्यमुक्त केले. यामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या फाइल थंडबस्त्यात पडल्या. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचा बांधकामाचा निधी रखडला आहे. परिणामी, लाभार्थ्यांना घराचे बांधकाम थांबवावे लागले.

मुंडीकोटा (जि. गोंदिया) : घरकुल मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी अर्ज केले. त्यांच्या अर्ज मंजूर होऊन अनेक लाभार्थ्यांना घरकुल मिळाले. मात्र कंत्राटी अभियंते असले; तरी वरिष्ठ अभियंता म्हणून मलेवार कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सर्व लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे. ज्यांच्या घरकुलाच्या फाइल उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांना माहिती देऊन ग्रामपंचायतस्तरावर पुन्हा प्रस्ताव मागितले जाऊ शकले असते. परंतु, पंचायत समितीचा गलथान कारभार उघड होऊ नये, याची खबरदारी घेतली जात असल्याचे स्पष्ट होते.

अतिरिक्त खर्च करावा

30 सप्टेंबर ते आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचे हप्ते निघू शकले नाहीत. आता नव्याने प्रस्ताव तयार करावयाचा झाल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर हा अतिरिक्त खर्च घरकुल लाभार्थ्यांना करावा लागणार आहे. पंचायत समिती तिरोडा घरकुल विभागाद्वारे समाजकल्याण कार्यालय तद्‌नंतर डीआरडीए कार्यालयाकडे रमाई घरकुलाचे प्रस्ताव पाठविण्यात आले. काहींना पात्र तर काहींना अपात्र करण्यात आले.

जाणून घ्या : येथून निघतो गांजाचा धूर; कसे काय?

निधीसाठी लाभार्थ्यांची फरपट

ज्यांना अपात्र करण्यात त्यांच्या त्रुटींची पूर्तता करून ते मंजूर करवून घेणे कार्यालयीन प्रणाली मानली जात आहे. जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत 12 महिन्यांचा काळ लोटून कोणतीही सूचना घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आली नाही. प्रधानमंत्री घरकुल योजना, सबरी घरकुल योजनेचे लाभार्थी अजूनही निधीसाठी पंचायत समिती कार्यालयाच्या येरझारा मारत आहेत. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन घरकुलाचा निधी ताबडतोब द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

अभियंत्यावर कारवाई करणार
सामान्य घरकुलधारकांचे कार्यालयीन प्रस्ताव हे कार्यालयात न ठेवता स्वतःकडे ठेवणाऱ्या अभियंत्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. यासंदर्भात माहिती घेणे सुरू आहे.
- नीता रहांगडाले, सभापती, पंचायत समिती, तिरोडा.

हेही वाचा की : काही दिवसांचा पाठलाग, नंतर केला हा प्रयत्न

घरकुलाचा निधी मिळावा
जानेवारी 2019 मध्ये रमाई घरकुल बांधकाम योजनेअंतर्गत प्रस्ताव दिला होता. परंतु, आजपर्यंत यावर तोडगा निघाला नाही. यात आमचे नुकसान झाले. आम्हाला लवकर घरकुलाचा निधी मिळावा, यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी.
- अजय नंदागवळी, घरकुल लाभार्थी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia : Gharkul nidhi Not get; How is the construction going to be?