गोंदिया : पंचनामे तर झाले, नुकसानभरपाई केव्हा?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

प्रशासनाने अवकाळी पावसात झालेल्या धानपिकाचे पंचनामे केले. परंतु, नुकसानभरपाई देण्याकरिता अद्याप कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासन, प्रशासनाने नुकसानभरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी तालुका कॉंग्रेससह विविध संघटनांनी केली आहे.

गोंदिया/सालेकसा : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात धानपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतपिकांचे उत्पादन अर्ध्यावर आले. काही शेतकऱ्यांना केवळ तणस घरी नेण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. इतकी विदारक अवस्था असताना प्रशासनाने केवळ पंचनामे करून गप्प बसण्यात धन्यता मानल्याचे दिसते. याबाबतचे निवेदनही तहसीलदारांना दिले आहे.

नुकसानभरपाईचे पाऊल अद्याप उचललेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. यासाठी प्रशासनाने नुकसानभरपाई त्वरित द्यावी, बॅंकांची दिवाळखोरी थांबवावी, अशी मागणी सालेकसा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

शेतकऱ्यांच्या पिंकांचे नुकसान झाल्याने नायब तहसीलदार भुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री भरत बहेकार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा)कटरे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, जिल्हा परिषदेच्या सभापती लता दोनोडे, कैलास अग्रवाल, ओमप्रकाश ठाकरे, लखनलाल अग्रवाल, शैलेश बहेकार, विजय फुंडे, नीतेश शिवणकर, आशुतोष असाटी, मंगेश चुटे, राजू जैन, ओमप्रकाश लिल्हारे, गुनाराम मेहर, मुकेश बैस, राजेश अडमे, मुस्ताक अन्सारी, संजय दोनोडे, मनोहर बारसे, रितेश लिल्हारे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडळनिहाय शेतपिकांचे सर्वेक्षण

गोंदिया येथील सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी तलाठ्यांमार्फत मंडळनिहाय शेतपिकांचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

नमुना आठ "अ'ची अट रद्द करा

सडक अर्जुनी ः अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सरकारने जमिनीचे पट्टे वाटले. सातबाराही दिला. शेतकरी आपल्या शेतात धानाचे उत्पादन घेतात. मागील वर्षापर्यंत त्यांचे धान शासकीय धान खरेदी केंद्रावर घेतले जात होते. पण यावर्षी सरकारने नमुना आठ मागितला आहे. मात्र, या जमिनीचा नमुना 8 अ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. दरम्यान, ही अट शिथिल करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia: Panchanama happened, give the crop loss benifit