बिबट्याचे अवयव विकणाऱ्यांना अटक, गोंदिया पोलिसांची कारवाई

मुनेश्‍वर कुकडे
Thursday, 19 November 2020

बिबट्याची कातडी आणि अवयवांची पाच लाख रुपयांत विक्री करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथून काही व्यक्ती भिवखिडकी शिवारात आले आहेत, अशी गुप्त माहिती अपर पोलिस अधीक्षक (देवरी कॅम्प) अतुल कुलकर्णी यांना मिळाली.

गोंदिया : बिबट्याची कातडी आणि अवयव पाच लाख रुपयांत विकण्यासाठी भिवखिडकी शिवारात आलेल्या तीन आरोपींना गोंदिया जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपी हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांना पुढील चौकशीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

बिबट्याची कातडी आणि अवयवांची पाच लाख रुपयांत विक्री करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथून काही व्यक्ती भिवखिडकी शिवारात आले आहेत, अशी गुप्त माहिती अपर पोलिस अधीक्षक (देवरी कॅम्प) अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यानुसार खात्री करून पोलिस निरीक्षक बी. डी. बोरसे यांनी पोलिस अंमलदारांचे पथक स्थापन केले व कारवाईची सूचना दिली. 

हेही वाचा - डिजिटल युगातही शेतकरी देतो पत्राद्वारे शुभेच्छा, ३७...

दरम्यान, या पथकाने एक डमी ग्राहक तयार करून त्यांच्यामार्फत बिबट्याची कातडी पाच लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी बोलणी केली. यावेळी भिवखिडकी शिवारातील लांजेवार राइसमिलजवळील शेतात देविदास दागो मरस्कोल्हे (वय 52, रा. झाडगाव, ता. साकोली, जि. भंडारा), मंगेश केशव गायधने (वय 44, रा. पोहरा, ता. लाखनी, जि. भंडारा) व रजनीश पुरुषोत्तम पोगडे (वय 32, रा. साकोली, जि. भंडारा) हे बिबट्याची कातडी, काळीज, गुडघा, दात व पंजे आदी अवयव स्वतःजवळ ठेवून विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आले. पथकाने जागीच सापळा रचून तिन्ही आरोपींना पकडले. पंचनामा केल्यानंतर बिबट्याची कातडी व अवयव जप्त करून तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात दिले. पुढील कायदेशीर कारवाई वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.

हेही वाचा -विदेशातील गुंतवणूक भोवली, राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर प्रहार

यांनी केली ही कारवाई -
पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात नवेगावबांधचे पोलिस निरीक्षक बी. डी. बोरसे, पोलिस उपनिरीक्षक नरेश उरकुडे, पोलिस हवालदार कोडापे, पोलिस शिपाई मडावी, चांदेवार, कोरे, देशमुख, पोलिस हवालदार भोगारे, पोलिस नायक मस्के, डहारे, लांडगे, पोलिस शिपाई क्षीरसागर, डोंगरवार, बर्वे, पोलिस नायक श्‍याम कोकोडे, पोलिस हवालदार सोनवाने, वनाधिकारी अग्रीम सैनी, एन. टी. चव्हाण, विशाल बोराडे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia police arrested three people who selling leopard body parts