ऑनलाइन परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये गोंडवाना विद्यापीठ नापास; अखेर पेपर केला रद्द

मिलिंद उमरे
Tuesday, 6 October 2020

गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा सोमवार (ता.५)पासून सकाळी ९ वाजता नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार होती. परंतु विद्यापीठात निर्माण झालेल्या इंटरनेटच्या तांत्रिक अडचणीमुळे ऐनवेळी सकाळचा पेपर दुपारी २ वाजता सुरू करण्याची सूचना विद्यापीठाद्वारे देण्यात आली. परंतु ही तांत्रिक अडचण वेळीच दूर न झाल्याने विद्यापीठावर आजचा पहिलाच पेपर रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

गडचिरोली : शैक्षणिक सत्र २०१९-२०२० मधील पदवी, पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या व अंतिम वर्षातील बॅकलॉग विषय असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेचा पहिलाच पेपर रद्द करण्याची वेळ येथील गडचिरोली गोंडवाना विद्यापीठावर आली. या पहिल्या ऑनलाइन प्रयत्नात खुद्द विद्यापीठच नापास झाल्याची टीका केली जात आहे.

ही ऑनलाइन परीक्षा सोमवार (ता.५)पासून सकाळी ९ वाजता नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार होती. परंतु विद्यापीठात निर्माण झालेल्या इंटरनेटच्या तांत्रिक अडचणीमुळे ऐनवेळी सकाळचा पेपर दुपारी २ वाजता सुरू करण्याची सूचना विद्यापीठाद्वारे देण्यात आली होती. ही तांत्रिक अडचण वेळीच दूर न झाल्याने विद्यापीठावर आजचा पहिलाच पेपर रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

जाणून घ्या : कोरोनाच्या भीतीपोटी 'यूपीएससी' परीक्षेला निम्मेच विद्यार्थी हजर, संधी वाया गेल्याची खंत

पेपर दुपारी दोन वाजता घेतला जाणार होता

गोंडवाना विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील १८ हजार ५०० विद्यार्थी ऑनलाइन; तर ७५० विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेला बसले आहेत. सोमवारी (ता. ५) सकाळी ९ वाजता होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी विद्यार्थी तयार होते. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी विद्यापीठाने पत्र काढून हा पेपर दुपारी २ वाजता घेण्यात येणार असल्याचे विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयांना कळविले होते.

अवश्य वाचा : माडिया समाजातील पहिले वकील लालसू नागोटी

आता ऑफलाइन परीक्षेचा पर्याय

सोमवारी दुपारी २ वाजता विद्यार्थी पेपर देण्याच्या तयारीत असताना पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थी आजचा पेपर देऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने पुन्हा पत्र काढून आजचा पेपर रद्द झाल्याचे कळविले आहे. आता विद्यापीठाला ऑफलाइन परीक्षेचा पर्याय द्यावा लागणार आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondwana University fails in first paper of online exam