esakal | शेतकऱ्यांसाठी गुडन्यज! कृषिसल्ला मिळणार आता मोबाईलवर
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

लाखनी तालुक्‍यातील एकूण २३ हजार ८०० हेक्‍टरमध्ये खरीप पीक असून भात पिकाखालील क्षेत्र २२ हजार ६०० हेक्‍टर आहे. गेल्या तीन ते चार वर्षात तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाचे क्षेत्रात वाढ केली असून यावर्षी सुमारे २०० हेक्‍टरमध्ये वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यज! कृषिसल्ला मिळणार आता मोबाईलवर

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

जेवणाळा (जि. भंडारा) : तालुक्‍यात कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल लिखित स्वरूपात मोबाईलवर सल्ला दिला जात आहे. यामुळे तालुक्‍यात येणाऱ्या संभाव्य आजारांवर वेळीच उपचार करता येत असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

लाखनी तालुक्‍यातील एकूण २३ हजार ८०० हेक्‍टरमध्ये खरीप पीक असून भात पिकाखालील क्षेत्र २२ हजार ६०० हेक्‍टर आहे. गेल्या तीन ते चार वर्षात तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाचे क्षेत्रात वाढ केली असून यावर्षी सुमारे २०० हेक्‍टरमध्ये वाढ झाली आहे.

यापैकी बरेच क्षेत्र हे ठिबक सिंचन व मल्चिंग खाली आहे. तसेच हळद, सुगंधी व औषधी वनस्पती, मका, पपई, फुलपिके व फळबाग या पिकांकडे शेतकरी वळत आहेत.

भात पिकावरील कीड व रोगाचे व्यवस्थापनाच्या संदर्भात कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना लिखित स्वरूपामध्ये कृषिसल्ला पुरविण्यात येत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी कार्यक्षेत्रातील पिकांवरील कीड व रोगाचे निरीक्षण मोबाईल ऍपवर घेतात. यात आढळून आलेली कीड व रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन लेखी स्वरूपात दिले जाते. या उपक्रमातील उद्देश कीड व रोगाची आर्थिक नुकसानीची पातळी व नियंत्रणाकरिता योग्य औषधांचा वापर करणे हा आहे.
हा उपक्रम राज्यात प्रथमच तालुका कृषी अधिकारी गिदमारे यांनी राबवला आहे.

त्यांनी गेल्या वर्षी कृषिसल्ला ही पुस्तिका तयार करून अधिकारी-कर्मचारी यांच्यामार्फत त्याचा प्रसार केला आहे. त्याला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच व्यापक स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची दखल कृषिमंत्री व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनीसुद्धा घेतली आहे.

अनावश्‍यक खर्च टाळण्यावर भर
कृषिसल्लाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनासाठी नेमकी आवश्‍यक औषधी कृषिसेवा केंद्रांकडून खरेदी करायची असते. काही कृषिकेंद्र धारक अनावश्‍यक औषधे देऊन शेतकऱ्यांचा अनावश्‍यक खर्च वाढवतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. तसेच याद्वारे कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी व शेतकरी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क वाढवण्यास मदत होत आहे.

अधिक माहितीसाठी - दररोज तुमचे रूप दाखवणारा आरसाच तुम्हाला करू शकतो कंगाल.. कसा ते वाचा

उत्पन्न वाढवावे
शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमात सहभागी व्हावे. कीड व रोगाचे योग्य नियंत्रण करून आपले उत्पादन व उत्पन्न वाढवावे.
पद्माकर गिदमारे,
तालुका कृषी अधिकारी, लाखनी.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top