esakal | अमरावती : पांढुर्णा येथील गोटमारीत २५० जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : पांढुर्णा येथील गोटमारीत २५० जण जखमी

अमरावती : पांढुर्णा येथील गोटमारीत २५० जण जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती) : गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पांढुर्णा येथील गोटमार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी बैठका घेतली आणि गोटमार होणार नाही, असे जाहीर केले. परंतु, प्रशासनाला न जुमानता पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांनी गोटमार मंगळवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता सुरू केली. यात २५० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मंगळवारी सकाळी सावरगाव येथील कावळे कुटुंबीयांनी जाम नदीच्या पुलावर मध्यभागी झेंडा बांधून दिल्यानंतर १० वाजेपर्यंत नागरिकांनी झेंड्याची पूजा केली. यानंतर गोटमार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सौरभकुमार सुमन, जिल्हा पोलिस अधीक्षक विवेक अग्रवाल यांनी घेतलेल्या बैठकीत ठरल्यानुसार सकाळी १० वाजता तो झेंडा पांढुर्णावासी नागरिकांच्या स्वाधीन करून देवी चंडिकेच्या मंदिरात ठेवण्यात येणार होता. परंतु, यामध्ये सहमत न झाल्याने सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोटमारीला सुरुवात झाली. यामध्ये २५० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले असून यातील गंभीर जखमींना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा: पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

यावेळी सावरगाव आणि पांढुर्णा येथील नागरिकांमध्ये तुफान गोटमार सुरू झाल्याचे चित्र दिवसभर दिसून येत होते. यावेळी इतर ठिकाणांचे नागरिकही गोटमारीत सहभागी झाले होते. दरम्यान पांढुर्णा शहरातील जवाहर वाचनालयावर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने वाचनालयाचे नुकसान झाले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक शशांक आनंद यांनी भेट दिली.

पांढुर्णा येथील नागरिक नेहमीच झेंडा तोडण्याचा प्रयत्न करतात आणि सावरगाव येथील नागरिक त्या झेंड्याचे रक्षण करतात. यावर्षी जाम नदीत दगडांची कमतरता दिसून आली. दरम्यान काही नागरिकांनी घरातील पोत्यांमध्ये जमा करून ठेवलेले दगड घेऊन गोटमारस्थळी हजेरी लावली. तर काही नागरिक नदीतील दगडांनी गोटमार खेळत असल्याचे दिसून आले.

loading image
go to top