साधा ताप-खोकल्याच्या उपचाराला हजारावर खर्च!; वाडीला मिळेल का हो सरकारी रुग्णालय? 

विजय वानखडे :
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

सत्ताबदलानंतर रुग्णालय स्थापनेचे घोडे कुठे अडले? हा प्रश्न निर्माण होत आहे. वाडीत रुग्णालय व्हावे यासाठी अनेकदा कॉंग्रेसने आंदोलने केली आहेत,

वाडी, (जि. नागपूर) : नागपूर शहरालगतच्या वाडी ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून त्यास नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला. वाडीची लोकसंख्या 1 लाखाच्या घरात असताना येथे नगर परिषदेचे किंवा इतर कोणतेही सरकारी रुग्णालय नसल्याने जनतेला महागडे व खासगी उपचार घ्यावे लागत आहेत. आजार व अपघातांची संख्या वाढली असतानाच सरकारी रुग्णालयाची स्थापना न होणे हे वाडीवासीयांचे "दुर्दैवच' म्हणावे लागेल. 

नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सुसज्ज व सुविधाजनक रुग्णालयाची निर्मिती व्हावी यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. मागील वर्षी डेंगीने शहरात कहर माजविला होता. मात्र, सरकारी दवाखाना नसल्याने डेंगीने सहा तर यावर्षी तिघांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच महामार्गावरील गाव असल्याने येथे मार्गावर अपघात झाल्यास त्यास उपचारासाठी नागपूरलाच न्यावे लागते. वाडीमध्ये सरकारी दवाखान्याच्या नावावर फक्त माता बालसंगोपन केंद्र आहे. येथे केवळ गरोदर मातांची तपासणी करण्यात येते. दरम्यान, वाडी नगर परिषद झाल्यावर येथे शासकीय रुग्णालय होणार अशी चर्चा नागरिकांत होती. परंतु, जागेचा अभाव हेच कारण वारंवार समोर आले. 

खासगी दवाखान्यात आर्थिक लूट

शहरात शासकीय रुग्णालय नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागते. यात सामान्य नागरिकांची उपचाराच्या नावाखाली खासगी हॉस्पिटल व पॅथॉलॉजी यांनी महागड्या उपचाराने मोठ्या स्वरूपात आर्थिक पिळवणूक होते. अनेक मध्यमवर्गीय नागरिक या शहरात वास्तव्य करतात.आपल्या तुटपुंज्या मिळकतीत महागडे उपचार करणे शक्‍य होत नाहीत.

यामुळे लक्षात आली खरी गरज

मागील वर्षी वाडीत डेंगीने थैमान घातल्यावर स्थानिक प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड यांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग यांना पाचारण करण्यात आले व शंभरावर अधिक कर्मचारी आपल्या उपाययोजनेसह कामाला लागले. परंतु, तोपर्यंत सहा निष्पाप लोकांचे बळी या आजाराने घेतले होते. तर या वर्षी तीन निष्पाप लोकांचा बळी गेला.

जागा निश्‍चित झाली पण...

वाडीमध्ये सरकारी दवाखाना व्हावा यासाठी तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रयत्नाने नवनीतनगर येथील आयुधनिर्माणीच्या शासकीय जागेवर रुग्णालयाबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने त्याला हिरवा कंदीलही दिला होता. सत्ताबदलानंतर रुग्णालय स्थापनेचे घोडे कुठे अडले? हा प्रश्न निर्माण होत आहे. वाडीत रुग्णालय व्हावे यासाठी अनेकदा कॉंग्रेसने आंदोलने केली आहेत, ही मागणी आणखी रेटून धरली जाईल अशी माहिती युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अश्‍विन बैस यांनी केली आहे, 

शासकीय रुग्णालयाचा प्रस्ताव सादर
नगर परिषदेने जिल्हाधिकांऱ्यामार्फत राज्य सरकारला शासकीय रुग्णालयाचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, वर्षे लोटून गेल्यावरही अजूनपर्यंत राज्य शासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही. आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- प्रेमनाथ झाडे, नगराध्यक्ष, वाडी 

नागरिकांनी स्वतः जागरूक असणं गरजेचं

दिवसेंदिवस डेंगी रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे हे खरे आहे. नागरिकांनी ही याबाबत स्वतः जागरूक असणं गरजेचं आहे. 
- डॉ. शैलेश चालखोर, बालरोगतज्ज्ञ, वाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Hospital Need in Wadi