निवडणूक झाली आता तरी "ईव्हीएम' हटवा  शासकीय आयटीआयची कार्यशाळा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात, प्रशिक्षणावर होतोय परिणाम 

वसंत डामरे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

मतमोजणी झाल्यानंतर सर्व साहित्य व पहिल्या माळ्यावरील खोल्यांत ठेवून ती सील केली. विशेष म्हणजे या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी दीड लाख खर्च झाल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रामटेक,(जि. नागपूर)  : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षणाची कार्यशाळा निवडणूक विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती. 30 सप्टेंबरपासून ही कार्यशाळा निवडणूक विभागाच्याच ताब्यात असल्याने तब्बल 57 दिवसांपासून संस्थेतील 302 प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे वाहीटोला स्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भव्य अशा व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेला निवडणूक विभागाने पत्र देऊन आपल्या ताब्यात घेतले. दरवेळी फक्त मतमोजणीसाठीच ही कार्यशाळा घेतली जात होती. मतमोजणीनंतर निवडणूक साहित्य कार्यशाळेच्या पहिल्या माळ्यावरील दोन वर्गखोल्यामधून ठेवून त्या "सील' करून ठेवल्या जात होत. त्या दोन्ही वर्गखोल्यांचा वापरच होत नसल्याने प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात कोणतीच अडचण राहात नव्हती. 

कार्यशाळेत दुरुस्तीसाठी दीड लाख खर्च

यावेळी निवडणुकीचे संपूर्ण कामकाजच संस्थेच्या हॉलमधूनच केले गेले ते थेट मतमोजणीपर्यंत. 30 सप्टेंबरपासून ही कार्यशाळा निवडणूक विभागाने ताब्यात घेतली. मतमोजणी झाल्यानंतर सर्व साहित्य व पहिल्या माळ्यावरील खोल्यांत ठेवून ती सील केली. विशेष म्हणजे या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी दीड लाख खर्च झाल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तत्काळ ही कार्यशाळा मोकळी करा

आयटीआयमध्ये रामटेक, सावनेर, पारशिवनी, मौदा, तुमसर, भंडारा, नागपूर या तालुक्‍यांतील अनेक गावांमधून आयटीआयमध्ये विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात. निवडणूक विभागाने तत्काळ ही कार्यशाळा मोकळी करून द्यावी अशी मागणी अमित सोनवणे, अंशुल बनारकर, आलीश शेख, आशीष मेश्राम, अमोल खडसे, कमलेश वाघ, प्रणय कोठे, अंशुमन गजभिये, धम्मदीप पाटील, पवन बागडे, अविनाश चांदूरकर, राहुल मेश्राम, कैलास फाये, मोनू आस्वले, रोहित बघारे, विवेक हुमणे या विद्यार्थी प्रशिक्षणार्थ्यांनी केली आहे. 

तर, परीक्षेपासून प्रशिक्षणार्थी वंचित

आयटीआयमध्ये एकूण 8 व्यवसाय व 15 युनिट आहेत. संस्थेत प्रथम वर्षाला 212 तर द्वितीय वर्षाला 90 प्रशिक्षणार्थी व्यवसाय प्रशिक्षण घेत आहेत. याशिवाय या प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाइन हजेरी द्यावी लागते. एकूण दिवसाच्या 80 टक्‍के उपस्थिती अनिवार्य आहे. असे न झाल्यास प्रशिक्षणार्थी परीक्षेला बसू शकत नाहीत. 

68 दिवसांपासून कार्यशाळा बंद 

24 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर 45 दिवस त्या सिलबंद खोल्यांना सुरक्षित ठेवावे लागते. आता यावेळी परिस्थिती अशी आहे की, 24 ऑक्‍टोबरपासून पुढील 45 दिवस म्हणजे 8 डिसेंबरपर्यंत ही कार्यशाळा निवडणूक विभागाच्याच ताब्यात राहील. एकूणच 30 सप्टेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत होतील एकूण 68 दिवस ही कार्यशाळा बंद आहे. 

तुम्ही कार्यशाळेचा वापर करा

कार्यशाळा उघडण्याबाबत 4 नोव्हेंरबरला रामटेकचे निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना पत्र दिले आहे. त्यांनी तुम्ही कार्यशाळेचा वापर करा असे सांगितले. मात्र, कार्यशाळेला त्यांनी कुलूप लावले आहे. ते मात्र उघडले नाही. - गुणानंद वासनिक, प्राचार्य, शासकीय आयटीआय 

तक्रार कुणाचीच नाही

कार्यशाळेच्या खोल्यांत ईव्हीएम मशीन्स,त्यांच्या बॅटरीज व इतर साहित्य सील केले आहे. त्याला कोणतेही नुकसान न पोहोचविता कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले जावे. प्रात्यक्षिक होत नसल्याची तक्रार घेऊन एकही प्रशिक्षणार्थी माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. 
- जोगेंद्र कट्यारे, उपविभागीय अधिकारी, रामटेक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government ITI in possession of Election Department