शहिदांच्या आठवणीने गोवारी बांधव गहिवरले! श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

23 नोव्हेंबर 1994 ला नागपूरमध्ये टी पॉइंटवर झालेल्या चेंगराचेंगरीत 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गोवारी शहीद स्मारक परिसरात "अभिवादन सभा' घेण्यात आली.

नागपूर  : पंचेवीस वर्षांपासून शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आलेला प्रत्येक पुढारी मंचावर येतो आणि आश्‍वासन देऊन जातो. परंतु, 114 शहिदांच्या रक्ताची किंमत अजूनही सरकारने अदा केलेली नाही. हक्क मिळाल्याने काही अंशी न्यायालयीन लढाई आम्ही जिंकली. गोवारींसह 15 आदिवासी जमातींचे अस्तित्व संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. यामुळे नव्या सामाजिक लढाईसाठी रस्त्यावरचे आंदोलन जिवंत ठेवावे लागणार आहे. तेव्हाच आम्ही गोवारी शहिदांचे वारस ठरू, असे मत प्रा. वामन शेळमाके यांनी आज व्यक्त केले. 

गोवारी शहीद स्मारक परिसरात "अभिवादन सभा'

23 नोव्हेंबर 1994 ला नागपूरमध्ये टी पॉइंटवर झालेल्या चेंगराचेंगरीत 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गोवारी शहीद स्मारक परिसरात "अभिवादन सभा' घेण्यात आली. फुलांनी सजविलेल्या शहीद गोवारी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गोवारी बांधव जथ्या-जथ्याने आले होते. येणारा प्रत्येक गोवारी बांधव स्मारकाकडे बघत होता. डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंसह आदरांजली अर्पण करीत होते. सारा परिसर गजबजला होता. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या महिला कडेवरील मूल सांभाळत ते क्षण आठवत होत्या. सारे वातावरण भारावले होते. 

यावेळी गोवारी व्यासपीठावर राजेंद्र मरसकोल्हे, शालिक नेवारे, कैलास राऊत, हेमराज नेवारे, झेड. आर. दुधलकर, सामाजिक न्याय विभागाच्या जातपडताळणी विभागाचे उपायुक्त आर. डी. आत्राम, दादासाहेब रास्ते, गोवर्धन काळसर्पे, भास्कर राऊत, ऍड. मंगेश नेवारे, सुरेंद्र राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'चे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे होते. 

आदिवासींना संपवण्याचे कारस्थान  : प्रा. शेळमाके 

प्रा. शेळमाके म्हणाले, गोंड आणि गोवारी दोन आदिवासी समाजातील स्वतंत्र जाती आहेत. परंतु, गोंडगोवारी असे एकत्रीकरण करून सरकारने आदिवासींना संपवण्याचे कारस्थान सुरू केले. देशात आदिवासींच्या 456 तर राज्यात 45 जाती असल्याची माहिती त्यांनी दिली. उपायुक्त आर. डी. आत्राम म्हणाले, 14 ऑगस्ट 2018 आणि 25 जानेवारी 2019 हे दोन्ही निर्णय गोवारींना दिलासा देणारे आहेत. परंतु, अद्याप या सरकारने विशेष प्रवर्गातून (एसबीसी) गोवारींना वगळले नाही. 

परिणय फुके यांचे अभिवादन 

राजेंद्र मरसकोल्हे म्हणाले, गोवारी समाजाच्या प्रगतीची दालने सुरू झाली असताना समाजाच्या प्रगतीला बाधा पोहोचतील, असे वागू नये. कैलास राऊत यांनी गोवारींच्या शहीद स्मारकाचे सरकार आणि विरोधी पक्षाकडून राजकारण होत आहे. 25 वर्षांपासून प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी खेळवले आता गोवारींना सरसकट लाभ मिळेल, असा अध्यादेश सरकारने काढावा, अशी मागणी केली. सकाळी माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी गोवारी शहीद स्मारकाला अभिवादन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gowari brothers are deeply saddened by the memory of martyrs! Rush to pay tribute