या जिल्ह्यातील ग्रामसभांचे सहा कोटी रुपये का थकले...वाचा हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

स्नेहलकुमार बिपिनभाई पटेल यांनी स्नेहल ट्रेडिंग कंपनी व किशोरीलाल ऍण्ड कंपनी यांच्या नावाने प्रथम हप्त्याची रॉयल्टी ग्रामसभांच्या खात्यात जमा केली. परंतु पुढील हप्त्यांची रक्कम कंत्राटदाराने ग्रामसभांना दिली नाही. या कंत्राटदाराने सुमारे 10650 स्टॅंडर्ड बॅग तेंदूपाने तोडली असून, रॉयल्टीची एकूण रक्कम 6 कोटी 40 लाख 66 हजार 654 रुपये एवढी आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : एका कंत्राटदाराने तेंदूपत्ता संकलनाचे सुमारे 6 कोटी 40 लाख रुपये अडवून ठेवल्याने ग्रामसभांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून पैसे वसुलीसाठी प्रयत्न न करता प्रशासन त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

2017 मध्ये एटापल्ली तालुक्‍यातील सुरजागड इलाख्यातील गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, जांभिया व जवेली ग्रामपंचायतीअंतर्गत जंगलातील तेंदूपाने संकलन करण्याकरिता ग्रामसभांना कुसुम ट्रेडर्स या कंपनीशी करारनामा करून काम देण्यात आले.
त्यातील गट्टा, जांभिया व गर्देवाडा या युनिटकरिता प्रतिस्टॅंडर्ड बॅग 16 हजार रुपये, तर वांगेतुरी व जवेली युनिटकरिता 14 हजार रुपये दर ठरविण्यात आला होता. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने तेंदूपाने संकलन करून त्यांची स्वतःच्या गोदामात साठवणूकही केली.

कंत्राटदाराने रक्कम दिली नाही

त्यानंतर स्नेहलकुमार बिपिनभाई पटेल यांनी स्नेहल ट्रेडिंग कंपनी व किशोरीलाल ऍण्ड कंपनी यांच्या नावाने प्रथम हप्त्याची रॉयल्टी ग्रामसभांच्या खात्यात जमा केली. परंतु पुढील हप्त्यांची रक्कम कंत्राटदाराने ग्रामसभांना दिली नाही. या कंत्राटदाराने सुमारे 10650 स्टॅंडर्ड बॅग तेंदूपाने तोडली असून, रॉयल्टीची एकूण रक्कम 6 कोटी 40 लाख 66 हजार 654 रुपये एवढी आहे.

जिल्ह्यातील मोठा हंगाम

तेंदू हंगाम हा गडचिरोली जिल्ह्यातील मोठा हंगाम आहे. या हंगामात कंत्राटदार मोठी रक्कम कमावतातच; शिवाय ग्रामीण नागरिकांनाही पावसाळ्यातील तीन-चार महिने पुरेल, एवढी रक्कम गोळा होते. पूर्वी वनविभागामार्फतच तेंदू युनिटचे लिलाव होत असत. परंतु पेसा व वनाधिकार कायद्यामुळे जनजागृती झाल्यानंतर ग्रामसभा तेंदू युनिटचे लिलाव करू लागल्या, तर काही ग्रामसभांनी स्वतःच तेंदूपाने संकलन करण्यापासून तर विक्रीपर्यंतची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक मदत होत आहे.

असं घडलंच कसं? : गडचिरोली : नक्षलवाद्यांची वनरक्षकांना बेदम मारहाण, वनविभागाचे कार्यालयही जाळले

त्या कंत्राटदाराची वाहतूक थांबवा

ग्रामसंभांची फसवणूक केलेल्या कंत्राटदाराने यंदा धानोरा व अन्य तालुक्‍यांत तेंदूचे कंत्राट घेतले. तेंदूची वाहतूकही सुरू केली आहे. ग्रामसभांचे कोट्यवधी रुपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या कंत्राटदाराला जिल्ह्यातून तेंदूपानांची वाहतूक करण्यावर निर्बंध घालावे, अशी मागणी करणारे पत्र ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांना दिले आहे. त्यानंतर सीईओंनी गडचिरोली व वडसा येथील उपवनसंरक्षकांनाही पत्र देऊन संबंधित कंत्राटदाराला तेंदूपानांची वाहतूक करू देऊ नये, अशी मागणी केली आहे. मात्र यावर अद्यापही कारवाई झाली नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram sabhas waiting for six crore rupees of tendupatta