सध्या ग्रामपंचायत निवडणुका नको, तहसीलदारांचा अभिप्राय; इच्छुकांच्या पदरी मात्र निराशा

राजकुमार भितकर
Tuesday, 29 September 2020

यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 460 तसेच दुसऱ्या टप्प्यातील जवळपास तेवढ्याच ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. त्यामुळे गावागावांत निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते

यवतमाळ : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 460 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. कोरोनामुळे निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यासंदर्भात विचारणा केली होती. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच तहसीलदारांनी सध्याच निवडणुका नको, असे मत व्यक्त केले. त्यामुळे निवडणूक विभागाने आयोगाला पाठविलेल्या पत्रात निवडणुका सध्या घेण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 460 तसेच दुसऱ्या टप्प्यातील जवळपास तेवढ्याच ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. त्यामुळे गावागावांत निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसंर्गानंतर आयोगानेच निवडणुकीला स्थगिती दिली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. सध्या गावाचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. प्रशासक नियुक्तीवरूनही मध्यंतरी बरेच मुद्दे चर्चेत आले. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र, काहिंनी निवडणुकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूक विभागाला पत्र पाठवून अभिप्राय मागितला होता. जिल्ह्यातील तहसीलदारांनी कोरोनाचा वाढता संसंर्ग पाहता सध्या निवडणुका घेणे योग्य ठरणार नसल्याचे मत नोंदविल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - नातेवाईकाच्या अस्थि विसर्जनासाठी आला अन् वाहून गेला;...

सध्या शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरले आहे. अशास्थितीत निवडणुका घेतल्यास संसर्ग पसरण्याची भीती तर आहेच. शिवाय, अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे या काळात निवडणुका घेऊ नये, अशी विनंती निवडणूक विभागाने आयोगाला केली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस गावाचा कारभार प्रशासकांच्या हाती असणार आहे.

हेही वाचा - यवतमाळात ८९ डॉक्‍टरांचे राजीनामे; जिल्हा प्रशासनाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप

इच्छुकांच्या पदरी निराशा -
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच अनेक इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले होते. तशी तयारीही काहींनी सुरू केली होती. मात्र, कोरोनाचा संसंर्ग वाढला आणि निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळाली. यामुळेच अनेक इच्छुक गारद झाले असून, स्वप्नांवर कोरोनाने पाणी फिरविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grampanchayat election will not taken yet due to corona in yavatmal