esakal | बच्चू कडूंचा इशारा लूट थांबवा, नाहीतर मी सोडणार नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu_kadu.jpg

हुंडी चिठ्ठीच्या माध्यमातून अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यांसह मायक्रो फायनान्स कंपन्या जिल्ह्यातील शेतकरी व गरीबांची लूट करत आहेत. यासंबंधीच्या काही तक्रारी मिळत असल्या तरी अनेक नागरिक तक्रारी करण्यासाठी समोर येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शेतकरी व गरीबांची लूट थांबवावी, नाहीतर मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनाला दिला. 

बच्चू कडूंचा इशारा लूट थांबवा, नाहीतर मी सोडणार नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : हुंडी चिठ्ठीच्या माध्यमातून अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यांसह मायक्रो फायनान्स कंपन्या जिल्ह्यातील शेतकरी व गरीबांची लूट करत आहेत. यासंबंधीच्या काही तक्रारी मिळत असल्या तरी अनेक नागरिक तक्रारी करण्यासाठी समोर येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शेतकरी व गरीबांची लूट थांबवावी, नाहीतर मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनाला दिला. 

हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज व त्याची होणारी नियमबाह्य व अव्वाच्या सव्वा वसूली या संदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रारींचा व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (ता. 20) दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा चांगलाच समाचार घेतला. 

अवैध सावकारीच्या प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अद्याप राठी नामक सावकारवर गुन्हे दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे डॉ. प्रवीण लोखंडे यांची चांगलीच खरडपट्टी काढली. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया तसेच इतर विभागांचे प्रमुख सुद्धा उपस्थित होते. 

अवैध सावकार राठी प्रकरणात धरले धारेवर
हुडीचिठ्ठीचा व्यवहार करून अवैध सावकार राठी नागरिकांची लूट करत आहे. एका चिठ्ठीवर 15-15 लाखांचे अवैध व्यवहार सदर सावकार करत आहे. यासंबंधिचे पुरावेच आढावा बैठकीत एका पिडीत व्यक्तीने सादर केले. सदर सावकाराच्या घरी मारलेल्या छाप्यात 40 लाख रुपये जप्त करण्यात आले. परंतु त्यानंतर सुद्धा त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे सदर सावकाराला सहकार विभागाचे अधिकारी का पाठिशी घालत आहेत, असा सवाल पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला. संबंधित सावकारावर कारवाई करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ देतो, त्यानंतर सोडणार नाही, असा दम सुद्धा त्यांनी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. संबंधित सावकाराच्या घरी, कार्यालयात छापे टाका. सदर प्रकरण आयकर विभागात का जात नाही, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. 

पालकमंत्र्यांच्या राग अनावर
आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांच्या राग अनावर झाला. त्यांनी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना फालतू उत्तर देवू नका. शहानपणा करू नका. अवैध सावकारी प्रकरणात कारवाई केली नाही तर चुलीत गेले पालकमंत्री पद... असे म्हणत त्यांनी सहकार विभागाने अवैध सावकारी प्रकरणात कारवाई न केल्यास मी माझा वकील लावेल, त्यानंतर कोणालाही सोडणार नाही, असा दम सुद्धा दिला. 

काय झाले आढावा बैठकीत

  • हुंडी चिठ्ठी व अवैध सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांनी सहकार विभागाद्वारे गठित करण्यात आलेल्या समितीकडे आतापर्यंत केवळ तीनच तक्रारी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली. संबंधित तक्रारींवर योग्य अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. 
  • मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शेतकरी व गरीबांची लूट सुरू असल्यामुळे संबंधितांवर आठ दिवसांत कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सहकार विभागाला दिले. 
  • सन् 2017 मध्ये करण्यात आलेल्या तक्रारीच्या बदल्यात सहकार विभागाने अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे यांचा पालकमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. 
  • अवैध सावकारी प्रकरणांसह इतर प्रकरणात पोलिस ठोस भूमिका घेत नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. 
  • अकोट तालुक्यातील शंभर आदिवाशी शेतकऱ्यांच्या नावे बॅंकेचे कर्ज काढण्यात आले. सदर कर्जाची रक्कम अवैध सावकाराने परस्पर काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती लिड बॅंकेचे आलोक तारेनिया यांनी दिली. त्यावर लवकर कार्यवाही करा, असा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.