व्हॉट्‌स ऍप स्टेटसवर ठेवला चाकू, पोलिसांना मिळाली माहिती आणि... 

शरद केदार 
Sunday, 19 July 2020

17 वर्षीय अल्पवयीन युवकाची चौकशी सुरू आहे. आधी अल्पवयीनाकडून चायनाचा बनावट कट्टा व एक धारदार चाकू जप्त केला होता.

चांदूरबाजार (अमरावती) : सोशल मीडियाच्या आजच्या युगात लहानांपासून वृद्धांपर्यंत सारेच मोबाईलचे वेडे आहेत. दररोज व्हॉट्‌स ऍप स्टेट्‌स बदलणे, फोटो बदलणे यातच बरेच जण धन्यता मानतात. असाच काही प्रकार करणे महाविद्यालयीन तरुणाला चांगलेच महागात पडले. काहीतरी हटके म्हणून करायला गेलेल्या अल्पवयीनाला स्वत:च्या व्हॉट्‌स ऍप स्टेटसवर बनावट कट्टा व चायना चाकू ठेवणे चांगलेच अंगलट आले. त्यामुळे पोलिस खरा देशीकट्टा बाळगणाऱ्या दोघांपर्यंत पोचले. 

पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांच्या पथकाने ही कारवाई केली. रुचित कुंभारे व संकेत ढोले अशी अटकेतील दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 17 वर्षीय अल्पवयीन युवकाची चौकशी सुरू आहे. आधी अल्पवयीनाकडून चायनाचा बनावट कट्टा व एक धारदार चाकू जप्त केला होता. तिघांविरुद्ध चांदूरबाजार ठाण्यात शनिवारी (ता. 18) रात्री आर्मऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल झाला. एमएच डब्ल्यू. 3970 क्रमांकाची जप्त कार रुचितच्या मालकीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवतीचा पोलिसाने केला विनयभंग
 

रुचित व संकेत हे दोघे शिरसगाव कसबा येथील रहिवासी आहेत. चांदूरबाजार येथील अल्पवयीनाने स्वत:च्या मोबाईलच्या व्हॉट्‌स ऍप स्टेटसवर एक चायना चाकू आणि बनावट कट्टा ठेवला होता. एका जागरूक नागरिकाने याबाबत पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी आधी अल्पवयीनास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने हा बनावट चायना कट्टा रुचित व संकेत या दोघांकडून विकत घेतल्याचे सांगितले. 

त्यानंतर पोलिसांनी नमूद दोघांना अटक केली. रुचितच्या मालकीच्या कारची झडती घेतली असता, कारमधून देशी बनावटीचा एक कट्टा जप्त केला. शिवाय तीन मोबाईलसुद्धा जप्त झाले. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय आखरे, रवी बावणे, सय्यद अजमत, स्वप्नील तंवर, पंकज फाटे, वसीम शहा, शांताराम सोनोने व महिला पोलिस शुभांगी काळे यांचे पथक सहभागी झाले होते. 
 

तिघेही महाविद्यालयीन विद्यार्थी 
व्हॉट्‌स ऍप स्टेटसवर बनावट अग्निशस्त्र व धारदार चाकू ठेवणाऱ्या अल्पवयीनास दोन महिन्यांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. अल्पवयीनासह रुचित व संकेत असे तिघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. 
अजय आखरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, विशेष पथक. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gun placed on WhatsApp status, police take action