वाळूऐवजी हाती लागला लाखोंचा गुटखा... वाचा कसे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी ग्रामीण पोलिस पेट्रोलिंग करीत असताना लाखोंचा गुटखा हाती लागला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या प्रारंभीच पोलिसांचे मनोबल उंचावले आहे. हैदराबाद येथून कारंजा येथे जात असलेला 41 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. 

यवतमाळ : राज्यात गुटखाबंदी असताना यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत चोरट्या मार्गाने आणि चढ्याभावाने गुटखा विक्री केला जातो. यवतमाळ, अमरावती, कारंजा, दिग्रस, दारव्हा, नेर, महागाव, आर्णी येथील बड्या गुटखा तस्करांची नावे कायम चर्चेत राहतात. गुटखा विक्रीतून तस्करांनी कोट्यवधींची माया गोळा केली आहे. 

यवतमाळ ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. दहा) सायंकाळी साडेसातला रुई-बेलोरा या आडमार्गावर गुटखा व ट्रक असा एकूण 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालक पांडुरंग तडकेरा (वय 39), वाहक पांडू मरपल्ली (वय 32, दोघेही रा. नागनकेरा, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. 

ट्रकमध्ये गुटखा 

यवतमाळ ग्रामीण पोलिस रुई ते बेलोरा मार्गावर वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, आडमार्गाने आलेला दहा चाकांचा ट्रक बघून त्यांना संशय आला. पोलिसांनी खाक्‍या दाखविताच आतमध्ये गुटखा असल्याची कबुली दिली. गुटखा हैदराबाद येथून कारंजा येथे नेत असल्याचे सांगितले. चालक मोबाईलद्वारे तस्कराच्या संपर्कात होता. गुटखा पकडल्याची माहिती मिळताच तस्कराने पोलिसांशी संपर्क साधला. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच तस्कराकडे लाखोंची "डिमांड' केली. त्यात कुणाचा किती वाटा, हेदेखील सांगितले. 

असे का घडले? : अपमान जिव्हारी लागल्याने भाजप कार्यकर्त्याने केले असे...

ठाणेदारांची आगपाखड 

कारवाई दडपण्यासाठी चार तास चर्चांची फेरी रंगली. अखेर डिमांड पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविल्याने गुटखासाठ्यासह ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. चक्क आपली किंमत एका कर्मचाऱ्याने लावल्याबद्दल ठाणेदारांनी आगपाखड केल्याची चर्चा पोलिस वर्तुळातून ऐकायला मिळाली. 

दरम्यान, अमरावती येथील गुटखा तस्करानेदेखील शनिवारी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात घिरट्या घातल्याची माहिती आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना गुटखा जप्तीची माहिती मिळाल्याने त्यालाही रिकाम्या हाताने परतीचा प्रवास करावा लागला. 

माफीया गळाला लागणार का? 

पोलिसांनी जप्त केलेला गुटखासाठा कारंजा येथे जात होता, अशी माहिती पोलिसांकडे आहे. गुटखाबंदीपासून तो माफीया कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आता इतका मोठा साठा आढळल्यानंतर कारंजाचा गुटखामाफीया पोलिसांच्या गळाला लागणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gutkha smuggling at yavatmal