esakal | धक्कादायक! ई- टेंडरींगला लागले 'हॅक'चे जाळे..ग्रामपंचायत स्तरावर प्रकार..वाचा सविस्तर  
sakal

बोलून बातमी शोधा

hacking of e tenders in chandrapur district read full story

स्पर्धेतील कंत्राटदारांना कमी करून मर्जीतल्यांनाच कशी कामे देता येईल, यासाठी जिल्हा परिषदस्तरावर येत असलेल्या ग्रामपंचायतींतून ई-टेंडरींगमध्ये घोळ करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 

धक्कादायक! ई- टेंडरींगला लागले 'हॅक'चे जाळे..ग्रामपंचायत स्तरावर प्रकार..वाचा सविस्तर  

sakal_logo
By
श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर: पूर्वी कोणत्याही कामाच्या निविदा लिफाफा पद्धतीने व्हायच्या. त्यातही "मॅनेज'चे प्रकार होत होते. यावर नियंत्रणासाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी ई टेंडरींग प्रणाली विकसित केली. तीन लाखांच्या आतील कामे विनानिविदेने केली जातात. त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते. मात्र आता या ई टेंडरिंगलाही हॅकचे जाळे लागले आहे. 

ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असते. ऑनलाइन प्रक्रियेने कामांसाठी कंत्राटदारांत मोठी स्पर्धा वाढली आहे. मात्र, स्पर्धेतील कंत्राटदारांना कमी करून मर्जीतल्यांनाच कशी कामे देता येईल, यासाठी जिल्हा परिषदस्तरावर येत असलेल्या ग्रामपंचायतींतून ई-टेंडरींगमध्ये घोळ करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 

हेही वाचा - बाप रे! नागपुरात कुत्र्याला कोरोना?... कुत्र्याला खोकला झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण..

'की' लॉक वापरून मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे

पूर्वी डेप्युटी सीईओंच्या डिजिटल 'की' वापरून निविदा होत होत्या. मात्र, त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या स्वतंत्र 'की' तयार केल्या. यातून ग्रामपंचायती मंजूर कामे नेटवर अपलोड करायच्या. डिजिटल "की'ची संपूर्ण माहिती ग्रामसेवक, सरपंचांकडे असायची. डिजिटल 'की' हाती असल्याने ती सुरू, बंद करण्याचे अधिकार त्यांनाच होते. याचाच आधार ते मर्जीतल कंत्राटदारांना कामे देण्यासाठी करायचे. मर्जीतल्या कंत्राटदारांकडून वेगवेगळ्या नावाने निविदा भरायला लावून 'की' लॉक करून ठेवायचे. "की' लॉकच्या प्रकाराने त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागीच होता येत नव्हते. 

मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्‍यता 

शहराला लागून असलेल्या एका ग्रामपंचायतीमध्ये मधल्या काळात कामाच्या निविदा निघाल्या. मात्र, या कामाची डिजिटल 'की' लॉक करून असल्याने अन्य कंत्राटदारांना निविदेप्रक्रियेत सहभागी होता आले. त्यांनी हा प्रकार बीडीओंच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर याची चौकशी झाली. चौकशीत ई-टेंडरींग कामाची की लॉक करून ठेवल्याचे उजेडात आले. त्याची दखल घेत सीईओंनी ग्रामसेवकाला निलंबित केले. असाच प्रकार नागभीड तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला. जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्ये असाच घोळ सुरू असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याची चौकशी केल्यास मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्‍यता आहे. 

नक्की वाचा - खजूर खा आणि आजारांना विसरा.. जाणून घ्या नियमित खजूर खाण्याचे फायदे...

वर्कऑर्डरच्या आधीच रस्त्याचे काम 

नागभीड तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीमध्ये ई-टेंडरींगमध्ये असाच घोळ करण्यात आला. नेहमीच हे काम असल्याने कंत्राटदाराने ते मिळेल याची खात्री आहे. त्यामुळे त्याने वर्कऑर्डर मिळण्याआधीच रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर त्याने पंचायत समितीस्तरावर देयकेही सादर केली. मात्र, वॅर्कऑर्डर नसतानाही देयक सादर केल्याने याचीही चौकशी लागली. त्यातून हा घोळ समोर आला. 

संपादन - अथर्व महांकाळ